सेनेचे फटाके काँग्रेस कार्यालयासमोर

By Admin | Updated: February 12, 2015 00:31 IST2015-02-11T23:03:27+5:302015-02-12T00:31:37+5:30

जयेंद्र रावराणेंचे वैभववाडीत झाले दणक्यात स्वागत

Front of the Congress Office | सेनेचे फटाके काँग्रेस कार्यालयासमोर

सेनेचे फटाके काँग्रेस कार्यालयासमोर

वैभववाडी : काँग्रेसला रामराम ठोकून नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांचे नव्या संपर्क कार्यालयात शिवसैनिकांनी दणक्यात स्वागत केले. रावराणेंच्या स्वागताचे फटाके काँग्रेस कार्यालयासमोर शिवसैनिकांनी फोडले. अनपेक्षितपणे घडलेल्या या प्रकाराची शहरात दिवसभर चर्चा सुरू होती.
माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके व रावराणे यांनी आठवडाभरापूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेसचे संपर्क कार्यालय असलेल्या शेजारच्या इमारतीत नवीन कार्यालय सुरू केले आहे. बुधवारी तालुका काँग्रेसच्या मासिक बैठकीसाठी सतीश सावंत यांचे आगमन होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून स्वागत केले. मात्र, सावंत यांचे प्रथमच फटाके फोडून केलेले स्वागत म्हणजे कोडेच होते, कारण अलिकडच्या काळात पूर्वी कधीच सतीश सावंत यांचे फटाक्यांनी स्वागत झाले नव्हते.
काँग्रेसच्या फटाक्यानंतर पंधरा- वीस मिनिटांनी जयेंद्र रावराणेंचे आगमन झाले. त्यावेळी शिवसैनिकांनी सावंतांच्या स्वागतावेळी फोडले गेलेल्या फटाक्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक क्षमतेचे फटाके काँग्रेस कार्यालयासमोर फोडून रावराणेंचे दणक्यात स्वागत केले. रावराणेंच्या शिवसेना प्रवेशामुळे शिवसैनिकांमध्ये बळ संचारल्याचे दिसून येत होते. दोन लगतच्या इमारतींमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेची कार्यालये असून त्यातील अंतर जेमतेम २५ फुटांचे आहे. त्यामुळे भविष्यात अशीच चढाओढ रंगण्याची चिन्हे आहेत. परंतु काँग्रेस कार्यालयासमोर शिवसैनिकांनी फोडलेल्या फटाक्यांची दिवसभर चर्चा सुरू होती. (प्रतिनिधी)

Web Title: Front of the Congress Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.