दलित अत्याचाराविरोधात मोर्चा
By Admin | Updated: October 31, 2014 23:30 IST2014-10-31T23:30:23+5:302014-10-31T23:30:55+5:30
जावखेडे हत्याकांडाचा निषेध : सूत्रधारांना अटक करण्याची मागणी

दलित अत्याचाराविरोधात मोर्चा
कणकवली : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जावखेडे गावातील जाधव कुटुंबीयांच्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ दलित अत्याचारविरोधी संघर्ष समितीच्यावतीने कणकवलीत शुक्रवारी दुपारी मोर्चा काढण्यात आला. प्रांताधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार संतोष खरात यांच्याकडे यासंदर्भातील निवेदन शिष्टमंडळाने दिले.
नगरमधील हत्याकांडाच्या सूत्रधारांना तत्काळ अटक करावी, हत्येच्या चौकशीत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना कडक शासन करण्यात यावे, दलित अत्याचारांच्या घटनांमध्ये गुन्हेगार का सुटतात? याचा अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने तत्काळ समिती स्थापन करावी, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
जावखेडे येथील संजय जाधव, जयश्री जाधव व त्यांचा मुलगा सुनिल यांची भीषण हत्या करण्यात आली. आधी खैरलांजी नंतर खर्डा आणि आता जावखेडे येथील ही जातीय अत्याचाराची तिसरी घटना आहे. या घटनेने महाराष्ट्रातील दलित समाज कधी नव्हे इतका हादरून गेला आहे. खैरलांजी हत्याकांडात महाराष्ट्र सरकारने गुन्हेगारांनाच अभय देण्याची भूमिका घेतल्याने अॅट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. किंबहुना अॅट्रॉसिटीचा कायदा हेतूपुरस्सर कमजोर करण्यात आल्याने दलित अत्याचाराच्या घटना कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहेत. जातीय अत्याचारापासून मुक्ती मिळण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनात्मक संरक्षण मिळवून दिले. मात्र, या कायद्यांची कठोर अंमलबजावणी सत्ताधाऱ्यांनी टाळल्याने दलित अत्याचाराच्या घटना कमी होण्याऐवजी वाढतच आहेत.
खैरलांजी हत्याकांडानंतर दलित समुदायाने तीव्र आंदोलन करूनही महाराष्ट्र सरकार दलितांवरील जातीय अत्याचाराबद्दल गंभीर नाही, हे जावखेडे येथील जाधव कुटुंबीयांच्या हत्याकांडाने सिद्ध झाले आहे. नगर जिल्ह्याला दलित अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून महाराष्ट्र सरकारने तातडीने घोषित करून प्राधान्याने तेथील दलितांच्या सुरक्षेबाबत गंभीर पावले उचलणे आवश्यक आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
शिष्टमंडळात प्रा.राजेंद्र मुंबरकर, सुरेश कदम, प्रमिता तांबे, विनायक हरकुळकर, स्वाती तेली, प्रदीप सर्पे, सुदीप कांबळे, सिद्धार्थ तांबे, व्ही.जी.कदम, अमोल कांबळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)