मित्राकडून मैत्रिणीला चार लाखांचा गंडा
By Admin | Updated: October 9, 2014 23:04 IST2014-10-09T21:44:44+5:302014-10-09T23:04:23+5:30
सावंतवाडीतील घटना : लग्नाचे आमिष दाखवत एटीएमसह दागिने लांबविले

मित्राकडून मैत्रिणीला चार लाखांचा गंडा
सावंतवाडी : सावंतवाडीतील युवकाने मैत्रीचा गैरफायदा घेत मैत्रिणीलाच तब्बल चार लाखांना गंडा घातल्याची घटना सावंतवाडीत घडली आहे. भेटण्याच्यानिमित्ताने घरात जाऊन एटीएम कार्डसह दागिने लांबविल्याची घटना घडली आहे. मैत्रीचे रूपांतर प्रेमात करत युवकाने लग्नाचे आमिष दाखवत त्या युवतीला कर्नाटकात नेऊन ठेवले होते. त्यानंतर हा सर्व प्रकार पुढे आला आहे. पोलिसांनी या युवकावर सध्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हुसेन राजसाब मुजावर (वय २१ रा. सावंतवाडी) असे या युवकाचे नाव असून सध्या तो फरार आहे.
दरम्यान, या युवकाच्या सततच्या प्रतापाने शहरातील अनेक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सावंतवाडी शहरात मध्यवर्ती ठिकाणी राहत असलेल्या हुसेन मुजावर याने माजगाव गरड येथे राहत असलेल्या एका युवतीशी मैत्री केली.
या मैत्रीचे रूपांतर सहा महिन्यांपूर्वी प्रेमात झाले होते. या प्रेमातूनच तो युवक सतत तिच्या घरी येत जात असे. त्यातून त्याचे लक्ष युवतीच्या घरातील एटीएम कार्डवर गेले आणि एटीएम कार्ड चोरले. ही बाब तिच्या घरच्यांना तब्बल चार महिन्यांनी लक्षात आली. त्या युवकाने एटीएम काडद्वारे बांदा, पेडणे व गोवा येथील एटीएम मशीनमधून तब्बल अडीच लाख रूपये काढले.
ही एटीएम कार्डची चोरी कोणाच्या लक्षात आली नाही, असे या युवकाच्या लक्षात येताच तब्बल १ लाख १० हजार रूपये किमतीचे युवतीच्या मावशीचे दागिनेही त्याने चोरले. मात्र, महिनाभरापूर्वी या युवतीच्या घरात पैशांची गरज असल्याने तिच्या नातेवाईकाने बँकेचे पासबुक येथील बँॅकेत नेले. त्यावेळी बँॅक खात्यात असलेले अडीच लाख रुपये नसल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी नातेवाईकांच्या लक्षात आणून देताच हा सगळा प्रकार पुढे आला. युवतीही घाबरली होती. त्यावेळी आपल्यावर प्रेम करणाऱ्या हुसेननेच हा प्रकार केला असावा, असा अंदाज त्या युवतीला आला. तिने घरच्यांना सांगितले. त्यावेळी हा सर्व प्रकार पुढे आला. या एटीएम कार्डबरोबरच त्याने मावशीचे सव्वा लाख रूपयांचे दागिने लांबविल्याचा प्रकारही यावेळी उघडकीस आला. (प्रतिनिधी)
एटीएम, दागिन्याबरोबर युवतीला पळविण्याचा डाव
हुसेन याने आपली मोहिनी युवतीवर टाकत काही दिवसांपूर्वी त्या युवतीला पळवून नेण्याचा डाव आखला होता. तिला बेळगाव येथे काही दिवस नेऊनही ठेवले होते. पण ती त्याच्या कचाट्यातून निसटून दोन दिवसांपूर्वीच सावंतवाडीत आली. त्यानंतर त्याचे अनेक प्रताप बाहेर आले आहेत. त्या युवतीने झालेला प्रकार पोलिसांना तसेच आपल्या कुटुंबाला सांगितला आहे. पोलिसांनी हुसेन यांच्या विरोधात सध्यातरी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, सध्या तो फरार असून दोन दिवसांपूर्वी हा युवक पोलीस ठाण्यात आला होता. मात्र, त्याचा जबाब घेऊन पोलिसांनी त्याला सोडून दिले होते.
युवकाच्या प्रतापापुढे पोलिसांनी हात टेकले
तीन महिन्यात तब्बल चार ते पाच मुलींच्या तक्रारी तसेच भरवस्तीत गाडी घुसवल्याचे प्रकार हुसेनने केले आहेत. मात्र, सावंतवाडी पोलीस हुसेन याला पाठिशी घालत असल्याचे दिसून येत आहे. एक कॉन्स्टेबल या प्रकाराची चौकशी करीत असून, यापूर्वीच्या अनेक प्रकरणात हुसेन दोषी असतानाही शहरात बिनधास्तपणे फिरत आहे. यामुळेच दररोज नवनवीन प्रकरणे करत असल्याचे पुढे येत आहे.