स्वातंत्र्यसैनिक आंदोलन करणार

By Admin | Updated: July 13, 2015 00:34 IST2015-07-12T23:13:35+5:302015-07-13T00:34:01+5:30

सत्याग्रहात सहभागी व्हा : जयानंद मठकर यांचा इशारा

The freedom fighters will conduct the movement | स्वातंत्र्यसैनिक आंदोलन करणार

स्वातंत्र्यसैनिक आंदोलन करणार

सावंतवाडी : गोवा स्वातंत्र्य संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांना आता सन्मानासाठी लढा देण्याची वेळ आली आहे. हुतात्मा स्मारकांची दुरवस्था थांबवावी, राज्यात स्वातंत्र्य सैनिकांना सन्मानाने जगता यावे, या मूलभूत मागण्यांसाठी मुख्यमंत्री त्यांना भेट देणे टाळत आहेत. त्यामुळे त्यांनी ३० जुलै रोजी मुुंबईत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
अखिल भारतीय गोवा स्वातंत्र्य संग्राम सैनिक संघाचे अध्यक्ष जयानंद मठकर यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, राज्यात शासकीय खर्चाने उभारलेल्या हुतात्मा स्मारकांची शासनाच्या अनास्थेमुळे झालेली दुरवस्था, मुंबईत येणाऱ्या राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांना उतरण्यासाठी उभारलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची सदनाची शोकांतिका आणि स्वातंत्र्य सैनिकांना राज्यात सन्मानाने जगता यावे, यासाठी राज्याने देऊ केलेल्या सोयी-सवलतींना अंमलबजावणीच्या नियमातील त्रुटीमुळे तसेच तांत्रिक कारणामुळे बहुसंख्य स्वातंत्र्य सैनिकांना वंचित रहावे लागत आहे.
राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या या व्यथा मांडण्यासाठी महाराष्ट्राच्या आजी-माजी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन अखिल भारतीय गोवा स्वातंत्र्य सैनिक संघाने भेट मागितली होती. माजी दोन्ही मुख्यमंत्री स्वातंत्र्य सैनिकांचे सुपुत्र असूनही स्वातंत्र्य सैनिकांच्या व्यथा जाणून घेण्यास त्यांना सवड काढता आली नाही.
इतर राज्यांशी तुलना करता राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांना निवृत्तीवेतन कमी मिळते. असे असूनही निवृत्ती वेतनात वाढ करण्याची मागणी न करता राज्यात शासनाने स्वखर्चाने उभारलेल्या हुतात्मा स्मारकांची दैनावस्था दूर व्हावी, या राज्यात स्वातंत्र्य सैनिकांसाठी मुंबईत उभारलेल्या स्वातंत्र्य सैनिक सदनाचा होणारा गैरवापर थांबवून त्याचा लाभ स्वातंत्र्य सैनिकांना मिळावा. तसेच स्वातंत्र्य सैनिकांना या राज्यात सन्मानाने जगता यावे, यासाठी शासनाने देऊ केलेल्या सोयी-सवलती स्वातंत्र्य सैनिकांना मिळाव्यात, एवढ्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट मागितली होती. पण त्यांना भेट देण्याची सुबुद्धी झाली नाही, हे राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे दुर्दैव म्हणायला हवे.
याबद्दल निषेध नोंदवायच्या म्हटले तर निषेध हा शासनाच्या इतक्या अंगळवाणी पडला आहे की, तो आता निरर्थक झाला आहे. १८ जूनला गोवा क्रांतिदिनाच्या अखिल भारतीय गोवा स्वातंत्र्य संग्राम सैनिक संघाच्या सभेत महात्मा गांधींच्या सत्याग्रहाच्या प्रणालीनुसार निषेधाऐवजी आत्मक्लेशानुसार खेद व्यक्त करण्यासाठी ३० जुलै रोजी मुंबईत दुपारी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत धरणे सत्याग्रह करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे. राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी सहभागी होऊन सत्याग्रह यशस्वी करावा, असे आवाहन संघाचे अध्यक्ष मठकर यांनी स्वातंत्र्य सैनिकांना केले आहे. (वार्ताहर)

Web Title: The freedom fighters will conduct the movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.