फसवेगिरी संपली, सतर्कता वाढली
By Admin | Updated: March 16, 2015 00:08 IST2015-03-15T23:46:54+5:302015-03-16T00:08:50+5:30
उत्पादक होतोय सतर्क : काजूच्या व्यवसाय बनला सचोटीचा !--काजू रे काजू भाग-२

फसवेगिरी संपली, सतर्कता वाढली
मेहरून नाकाडे - रत्नागिरी काजूच्या उत्पादकतेमध्ये चढ उतार असला तरी ग्रामीण भागापासून शहरापर्यंत ठिकठिकाणी विके्रेते काजू बी खरेदी करताना दिसतात. ग्रामीण भागातील काजू बी खरेदी परप्रांतीयांकडून सर्वाधिक होत असलेल्याचे दिसून येते. बेकरी उत्पादनावर काजू बीचे प्रमाण हळूहळू घटत आहे. शिवाय सतर्कतेमुळे फसवेगिरीचे प्रमाण कमी झालेले दिसून येत आहे.
बेकरीची उत्पादनांच्या बदल्यात काजू बी खरेदी करण्यात येते. अजूनही हे प्रमाण असले तरी ते किरकोळ आहे. ग्रामीण भागातील अनेक मंडळी शहरात नोकरी किंवा कामानिमित्त येत असल्याने दराबद्दल जागरूकता आली आहे. शहरात दर चांगला मिळत असला तरी तो निवडक किंवा दर्जेदार काजूला मिळतो. त्यामुळे परप्रांतीयांना सरसकट काजू बी घातली जाते. ग्रामीण भागातून परप्रांतीय ७० ते ८० रूपयांना खरेदी करून शहरात आणून तेच काजू ९० ते ९२ रूपयांना
विकतात. काजू व्यवसायातील आता परकेपण संपले असून स्थानिकांचाही या व्यवसायात सहभाग वाढत आहे. शिवाय उत्पादक शेतकरीही सजग झाला असल्याने व्यवसायात प्रामाणिकपणा आणि सजगपणा आला आहे.
वास्तविक बोंड तयार झालेनंतर त्यापासून विलग झालेले काजू निवडले जातात. मात्र काही शेतकरी हिरव्या बोंडाचे काजू काढले जातात. सुरूवातीला दर चांगला मिळत असल्याने अधिकाधिक काजू विक्रीला घातला जातो. शिवाय चोरीचे प्रमाण वाढत असल्याने राखणीला मनुष्यबळ खर्च करणे परवडत नाही. परिणामी शक्यतो काजू बी गोळा करण्यासाठी घाई केली जाते.
ग्रामीण भागात सुशिक्षित मंडळीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये जागरूकता आली आहे. भैय्यांना काजू बी घालताना दराबाबत घासाघीस नक्कीच केली जात आहे. परप्रांतीय काजूचा दर्जा पाहत नसल्यामुळे सरसकटसाठीचा दर दिला जातो. परिणामी दर कमी लाभत आहे.
रत्नागिरीचे काजू चवीला गोड व रूचकर असल्यामुळे परराज्यातून चांगली मागणी होत आहे. परप्रांतीयांकडून काजू बी गोळा करताना दर्जा तपासला जात नाही. लहान मोठी बी घातली जाते. त्यामुळे दर कमी प्राप्त होतो. मात्र, निवडक काजूला दर चांगला मिळतो. रत्नागिरी काजूची बेंगलोरमधूनही मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.
- प्रशांत टिळेकर,
काजू व्यावसायिक, रत्नागिरी.