रत्नागिरीत चार मतदान केंद्र संवेदनशील
By Admin | Updated: September 15, 2014 23:21 IST2014-09-15T22:39:31+5:302014-09-15T23:21:27+5:30
प्रसाद उकर्डे : दोन तालुक्यात ३४१ केंद्रांवर होणार मतदान

रत्नागिरीत चार मतदान केंद्र संवेदनशील
रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात रत्नागिरी आणि संगमेश्वर या दोन तालुक्यातील मिळून एकूण ३४१ मतदान केंद्र आहेत. त्यापैकी रत्नागिरी शहरातील चार मतदान केंद्र संवेदनशील असल्याने त्यांच्यावर सेंट्रल वेब कास्टिंगद्वारे लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद उकर्डे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी विधानसभा मतदार संघाची माहिती देण्यासाठी उकर्डे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. १५ आॅक्टोबरला राज्यात विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. १९ रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणीची प्रक्रिया शहरानजीकच्या कुवारबाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे व्हावे, यासाठी प्रस्ताव पाठविला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
रत्नागिरी आणि संगमेश्वर या दोन्ही मतदारसंघात एकूण ३४१ मतदान केंद्र आहेत. यामध्ये रत्नागिरीतील ३१०, तर संगमेश्वरातील ३१ मतदान केंद्रांचा समावेश आहे. या मतदान केंद्रात एकूण २६ क्षेत्र असून, २९ क्षेत्रिय अधिकाऱ्यांची, तर ३७५ मतदान केंद्राध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी एकूण १ हजार ९०४ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी १२ समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये परिवहन व्यवस्थापन समिती, आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी समिती, खर्च नियंत्रण समिती, संगणकीकरण समिती, निवडणूक आयोग निरीक्षक समिती आदी समित्यांचा समावेश असल्याची माहिती उकर्डे यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे राजकीय पक्ष व उमेदवार यांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावरून निवडणूक खर्च संनियंत्रण समितीअंतर्गत माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती, भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण पथके, व्हिडीओ सर्वेक्षण पथके आणि लेखा पथक स्थापन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. रत्नागिरी - संगमेश्वर मतदार संघात एकूण २ लाख ६२ हजार ८९४ मतदार असून, अजूनही मतदार यादी नोंदणीचा कार्यक्रम सुरू असल्याने मतदारांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे उकर्डे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सेंट्रल वेब कास्टिंगद्वारे लक्ष ठेवणार.
रत्नागिरीतील ३१०, तर संगमेश्वरातील ३१ मतदान केंद्रांचा समावेश.
मतदान केंद्रात एकण २६ क्षेत्र असून, २९ क्षेत्रिय अधिकाऱ्यांची, तर ३७५ मतदान केंद्राध्यक्षांची नियुक्ती.
एकूण १ हजार ९०४ कर्मचारी तैनात.
निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास कार्यरत निवडणूक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कक्षात निवडणुकीसंदर्भात प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारींची नोंद ठेवण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीसंदर्भात काही माहिती हवी असल्यास ०२३५२-२२६२४८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.