म्हाडदळकरांसह चौघांना अटक
By Admin | Updated: July 8, 2014 00:35 IST2014-07-08T00:30:06+5:302014-07-08T00:35:19+5:30
काँग्रेस तालुका उपाध्यक्षांना मारहाण प्रकरण

म्हाडदळकरांसह चौघांना अटक
कुडाळ : काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रुपेश पावसकर यांना मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस साईनाथ म्हाडदळकर याच्यासह चौघांंना कुडाळ पोलिसांनी अटक केली आहे. यामधील अन्य अकराजणांची चौकशी करणार असल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली.
कुडाळ येथील एमआयडीसी गणेशवाडी येथे काँगे्रेसचे तालुका उपाध्यक्ष रुपेश पावसकर यांना साईनाथ म्हाडदळकर व त्यांच्या अन्य १४ साथीदारांनी शनिवारी रात्री ९.३० वाजता लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी रॉड व लाकडी दांड्याचा वापर करून मारहाण केली होती.
याप्रकरणी पावसकर यांनी कुडाळ पोलिसात साईनाथ म्हाडदळकर, भूषण राणे, अनुय वेंगुर्लेकर, दादा चव्हाण, महेश म्हाडदळकर व अन्य दहाजणांविरोधात तक्रार नोंदविली होती. यातील साईनाथ म्हाडदळकर, भूषण राणे, अनुप वेंगुर्लेकर, दादा चव्हाण यांना सोमवारी दुपारी अटक केली होती. तसेच मारहाणीमध्ये वापरण्यात आलेल्या तीन कार गाड्या व इतर काही साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
या प्रकरणातील अन्य दहा जण असून त्यांची नावे मिळाली नाहीत. त्यांचा तपास सुरू आहे. तसेच खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले रुपेश पावसकर यांचाही तपास करण्यात येईल, अशी माहिती कुडाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. पी. पवार यांनी दिली. जिल्हा पोलीस उपअधीक्षक उत्तम चौरे यांनीही कुडाळ पोलीस ठाण्याला भेट देऊन याप्रकरणाबाबत माहिती घेतली. दरम्यान, अटक झालेले साईनाथ म्हाडदळकर व त्यांचे अन्य तीन साथीदार यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती कुडाळ पोलिसांनी
दिली. (प्रतिनिधी)