शिरोडा किनाऱ्यावर विदेशी पर्यटकांची मांदियाळी

By Admin | Updated: November 9, 2014 23:39 IST2014-11-09T21:01:25+5:302014-11-09T23:39:50+5:30

देशामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्रथम पर्यटन जिल्ह्याचा मान मिळाला.मात्र,

Foreign tourists on the shiroda coast | शिरोडा किनाऱ्यावर विदेशी पर्यटकांची मांदियाळी

शिरोडा किनाऱ्यावर विदेशी पर्यटकांची मांदियाळी

अभिजीत पणदूरकर - शिरोडा -देशामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्रथम पर्यटन जिल्ह्याचा मान मिळाला. मात्र, या मानाला साजेशा पर्यटनाच्या सुविधा याठिकाणी उपलब्ध नाहीत. आता जिल्ह्यातील स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारे देशीविदेशी पर्यटकांना खूणावू लागले आहेत. गोव्यात पर्यटनासाठी येणारे पर्यटक गोव्यापेक्षाही सिंधुदुर्गाच्या निसर्ग सौंदर्यावर भाळत आहेत. त्यामुळेच शिरोडा वेळागर समुद्रकिनारी जिल्ह्यासह विदेशी पर्यटकांची मांदियाळी पहावयास मिळत आहे.
पर्यटन जिल्हा समृद्ध होण्याकरिता पर्यटनासह येथील सहजरित्या उपलब्ध होणाऱ्या फळ व मत्स्य उत्पादनावर आधारीत उद्योगधंद्यांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या घोषणा अनेकवेळा झाल्या. त्यानंतर पर्यटननिधीतून जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणचे रस्ते व अन्य सुविधा करण्यात आल्या. मात्र, त्याचा वापर पाहिजे त्यारितीने झाला नाही. कारण, पर्यटन व्यवसायाकरिता आवश्यक व्यवस्थापन जिल्ह्यात अवलंबताना दिसून येत नाही. सद्यस्थितीत मात्र, ही स्थिती बदलताना दिसत आहे.
शिरोडा वेळागर येथील समुद्रकिनारी शनिवार व रविवार या दोन दिवसात हजारो पर्यटक दाखल होत आहेत. यामुळे येथील किनारे गजबजलेले दिसत आहेत.
यात बहुतांशी विदेशी पर्यटक आहेत. गोवा येथे फिरण्यासाठी आलेले पर्यटक सिंधुदुर्गातही दाखल होत असून गोव्यापेक्षाही सिंधुदुर्गातील स्वच्छ किनारे त्यांना आकर्षित करत असल्याचे हे पर्यटक सांगत आहेत.
पावसाळा संपल्यामुळे विदेशी पर्यटकांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटकही वेळागरला पर्यटनासाठी पसंती देत आहेत. पर्यटक येथील सुरुच्या बनात ठिकठिकाणी बसून त्यातून उन्हाच्या कवडशांचा खेळ पहात आहेत. तर काही विदेशी पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर उसळणाऱ्या लाटा, तसेच किनाऱ्यांवरुन वाळूतून फिरण्याचा, पायपीट करण्याचा आनंद लुटत असल्याचे दिसत आहे.

सोयीसुविधा पुरविण्यासाठी ग्रामस्थ सरसावले
शिरोडा वेळागर येथील समुद्रकिनारी पर्यटकांना आवश्यक त्या सुविधा देण्याचे प्रयत्न ग्रामस्थांकडून सुरु आहेत. पर्यटकांना खाण्यापिण्यासाठी येथे स्थानिकांकडून स्टॉल उभारण्यात आलेले आहेत. तर किनाऱ्यापासून काही अंतरावर विदेशी पर्यटकांकरिता विविध भाषेतील मॅगझिन व ग्रंथसंपदा यांच्यासह भारतीय संस्कृतीतील विविध ड्रेस उपलब्ध करुन देण्याकरिता स्टॉलही उभारण्यात आलेला आहे. यामुळे विदेशी पर्यटकांची विशेष अशी सोय होत आहे.

पर्यटकांची उंट, घोडेस्वारी
वेळागर येथे येणाऱ्या पर्यटकांकरिता पर्यटकांना काहीतरी विशेष मिळावे याकरिता येथे किनारा वॉटर स्पोर्टस्तर्फे बोटींग, जेट स्की, बनाना बोट, किनाऱ्यावर मोटरसायकलींग आदी वॉटर स्पोर्टस्ची सोय करण्यात आली आहे.
या वॉटर स्पोर्टस्चा विदेशी पर्यटकांसह जिल्ह्यातील पर्यटक आनंद लुटत आहेत. तसेच या ठिकाणी उंटाची व घोड्यांची सवारी घडविण्यासाठी काही तरुणांनी सोय केली आहे. येथील उंटाच्या आणि घोड्यांच्या सवारीचाही विदेशी पर्यटक पुरेपूर आनंद लुटत आहेत.
समुद्रकिनारी जाणारे रस्ते अद्यापही खड्ड्यांच्या साम्राज्यात लुप्त झालेले दिसून येत आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांमधूनही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Foreign tourists on the shiroda coast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.