वनपाल, वनरक्षकांचा संप आश्वासनानंतर स्थगित
By Admin | Updated: September 7, 2014 00:37 IST2014-09-07T00:19:01+5:302014-09-07T00:37:37+5:30
विविध मागण्यांचा शासनस्तरावर पाठपुरावा

वनपाल, वनरक्षकांचा संप आश्वासनानंतर स्थगित
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेने पुकारलेला संप अखेर शुक्रवारी प्रधान मुख्य वनसंरक्षक व वन विभागाचे मुख्य सचिव यांनी विविध मागण्यांचा शासनस्तरावर पाठपुरावा करुन त्या पूर्ण करण्याच्या दिलेल्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आला.
राज्यातील सर्व वनपाल, वनरक्षकांचा सुधारीत वेतनश्रेणीच्या मागणीसाठी २५ आॅगस्टपासून बेमुदत संप सुरू होता. २ सप्टेंबर रोजी संघटनेच्या प्रतिनिधींना प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी चर्चेसाठी बोलावून वनरक्षक-वनपाल यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याबाबतच्या प्रस्तावावर कार्यवाही सुरू आहे. याबाबत सकारात्मक निर्णय होण्यासाठी विभागाकडून वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे.
वेतनश्रेणीत सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता वनरक्षक व वनपाल संघटनांनी पुकारलेला संप मागे घेण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली होती.
वेतनश्रेणी सुधारणा करण्याबरोबरच नियमित प्रवास भत्ता, वनरक्षक, वनपाल यांना अतिकर्तव्य भत्ता, कालवार पदोन्नती, वनरक्षक वनपालांच्या पदनामात वाढ करणे, आश्वासित प्रगती योजना लागू करणे आदी मागण्यांबाबत वन विभागाकडून सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्यावर कोणताही निर्णय न झाल्याने संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संप सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रधान मुख्य वनसंरक्षक सक्सेना यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेकरिता बोलावून मागण्याकरिता पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने संप मागे घेण्यात आला.
वन विभागाच्या वनपाल व वनरक्षकांचा संप तात्पुरत्या स्वरुपात मागे घेण्यात आला असल्याची माहिती संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांनी दिली. संघटनेने आचारसंहितेच्या शक्यतेमुळे संप तात्पुरता मागे घेतला आहे. मात्र, मागण्या तीन महिन्यात पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.
यावेळी प्रमोद राणे, द. बा. देसाई, दत्तगुरू पिळणकर, श्रीकृष्ण परीट, सूर्यकांत सावंत, सहदेव सावंत आदी उपस्थित होते. (वार्ताहर)