सावंतवाडी - पट्टेरी वाघाची संख्या अगोदरच घटत असतनाच सावंतवाडी तालुक्यातील सरमळे दाभील येथील घनदाट जंगल परिसरात असलेल्या सात बाव या पाडवकालीन विहिरीत एका वाघिणीचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. ही घटना सोमवारी उघडकीस आली वनविभागाचे पथक घटनास्थळावर पोचले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात एखाद्या पट्टेरी वाघांच्या मृत्यूची ही पहिलीच घटना आहे.
सावंतवाडी तालुक्यातील दाणोली-बांदा रस्त्यावरील सरमळे दाभिल येथून सात आठ किलोमीटर जंगलात सात बाव या पाडवकालीन विहिरी असे दाभिल गावचे देवस्थान आहे.हा परिसर पूर्णता जंगलाने वेढलेला आहे.मुख्य रस्त्यावरून घटनास्थळावर पायी जाण्यासाठी किमान तीन ते साडेतीन तास चालत जावे लागते या ठिकाणी रविवारी रान माणूस प्रसाद गावडे व दाभिल गावातील सचिन घाडी हे पर्यटनाचा अभ्यास करण्यासाठी गेले होते.त्यावेळी त्यांना या ठिकाणी उग्र अशी दुर्गंधी येऊ लागली म्हणून विहिरीत जाऊन पहिले असता पट्टेरी वाघ दिसून आला त्यामुळे त्यानी रविवारी सायंकाळी गावात आल्यानंतर सोमवारी सकाळी वनविभागाला माहिती दिली.
त्यानंतर वनविभागाचे उपवनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांच्यासह वनविभागाचे तीन ते चाळीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळावर रवाना झाले दुपारी हे पथक घटनास्थळावर पोचल्यानंतर मृतदेह पट्टेरी वाघाचा असल्याची खात्री केली तसेच मृतदेह सडलेल्या असल्याने मृत्यू कशामुळे झाला याचा अभ्यास केला असता एका उंच कड्यावरून उतरना ही वाघीण यातील एका खोल विहिरीत कोसळली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे तसेच हा प्रकार पाच ते सहा दिवसापूर्वी घडल्याचे दिसून येत आहे.
वनविभागाकडून वाघिणीच्या मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ विद्यानंद देसाई डॉ विठ्ठल कराळे व डॉ मृणाल वरथी यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मानव वन्यजीव रक्षक काका भिसे व पंच यांच्या समोर चार ते पाच तास मृतदेहांची तपासणी केली वाघिणीचा मृतदेह पूर्णता सडलेल्या अवस्थेत असल्याने घटनास्थळावर शवविच्छेदन करण्यात आले व रात्री उशिरा वाघिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.