‘फूड फेस्ट’ने वाढवली ‘छंदोत्सवा’ची लज्जत
By Admin | Updated: December 29, 2014 23:43 IST2014-12-29T20:47:35+5:302014-12-29T23:43:13+5:30
कनिष्ठ महाविद्यालयाचा ‘फूड फेस्ट’ सर्वांच्या चर्चेचा आणि औत्सुक्याचा विषय ठरला.

‘फूड फेस्ट’ने वाढवली ‘छंदोत्सवा’ची लज्जत
रत्नागिरी : अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा छंदोत्सव म्हणजे नवनवीन कल्पना असे समीकरण यावर्षीच्या छंदोत्सवातही ‘फूड फेस्ट’च्या माध्यमातून सर्वांनी अनुभवले. ‘जो खाईल इथे फूड उसका बन जायेगा मूड’ हे घोषवाक्य घेऊन आलेला कनिष्ठ महाविद्यालयाचा ‘फूड फेस्ट’ सर्वांच्या चर्चेचा आणि औत्सुक्याचा विषय ठरला.
एकूण १५ गटांचे १५ स्टॉल्स १५ प्रकारचे खाद्यपदार्थ विद्यार्थ्यांसाठी देण्यास सज्ज झाले. छंदोत्सवाच्या तीन दिवसात दररोज ५ स्टॉल्स ठेवण्यात आले. जवळपास १५० विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग या उपक्रमात होता. उत्पादन, जाहिरात, विक्री, संवाद, व्यवस्थापन, सादरीकरण, जमाखर्च, स्वच्छता, पर्यावरणीय दृष्टीकोन अशी कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये विकसीत व्हावीत, हा दृष्टीकोन या उपक्रमामागे आहे. उपप्राचार्य डॉ. श्रीकृ ष्ण जोशी, प्रा. माधव पालकर, प्रा. श्रीकांत दुदगीकर यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या या उपक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. वैभव कानिटकर यांनी काम पाहिले.
छंदोत्सवाच्या पहिल्या दिवशी हॉटेल उद्योजक उदय लोध यांच्याहस्ते या फूड फेस्टचे उद्घाटन झाले. पहिल्या दिवशी टेम्प्टेशन, फुडीच, यम्मी अॅण्ड मम्मी, एफसी आणि फुड मेनिया या स्टॉल्सवर शेजवान सॅण्डविच, कोल्ड कॉफी, अमेरिकन चाट, कॉर्नबॉल, कोळाचे पोहे या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रचंड गर्दी केली होती.फूड फेस्टचे परीक्षण प्रा. माधव पालकर, प्रा. सीमा बोंद्रे, प्रा. हिराजी शेजवळ यांनी केले. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. (प्रतिनिधी)