अन्न व औषध प्रशासनातर्फे सिंधुदुर्गात नियंत्रण कक्ष
By Admin | Updated: May 29, 2017 16:58 IST2017-05-29T16:57:57+5:302017-05-29T16:58:26+5:30
औषध विक्रेत्यांचा बंद : संपात सहभागी न होण्याचे आवाहन

अन्न व औषध प्रशासनातर्फे सिंधुदुर्गात नियंत्रण कक्ष
आॅनलाईन लोकमत
सिंधुदुर्गनगरी, दि. २९ : आॅनलाईन फार्मसीच्या विरोधात केमिस्ट असोसिएशने दिनांक ३0 मे रोजी देशव्यापी बंदीची घोषणा केली आहे. सर्व औषध विक्रेत्यांना सार्वजनिक आरोग्याच्या व आपतकालीन रुग्णांच्या हिताच्या दृष्टीने आपल दुकाने नियमितपणे सुरु ठेवून संपात सहभागी न होण्याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. तथापी या बंदच्या काळात रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने खास नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याकरीता हे नियंत्रण कक्ष स्थापन केले असून त्यावर नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील रुग्णांना सुरळीत औषध पुरवठा व्हावा, यासाठी प्रशासनामार्फत योग्य ती उपाययोजना करण्यात आली आहे. खासगी, निमशासकीय, शासकीय रुग्णालये, तसेच सर्व डॉक्टरांना, रुग्णांसाठी पुरेसा औषधसाठा ठेवण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
रुग्णांना औषध मिळण्यास काही अडचणी आल्यास ते एफडीएच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधू शकतात.
तातडीच्या वेळी औषधांची गरज भासल्यास सामान्य रुग्णालय सिंधुदुर्गनगरी येथे औषधे उपलब्ध होऊ शकतील. नियंत्रण कक्षातीलश्रीमती पा. सं. अय्यर, वि. वि. पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सिंधुदुर्गचे अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.