फोंडाघाट महाविद्यालय प्रथम
By Admin | Updated: August 24, 2014 00:50 IST2014-08-24T00:48:25+5:302014-08-24T00:50:40+5:30
मुंबई विद्यापीठाचा ‘जागर जाणिवांचा अभियान’ उपक्रम

फोंडाघाट महाविद्यालय प्रथम
कणकवली : राज्यातील महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत स्त्रीपुरूष समानतेची बीजे रूजविण्यासाठी अणि विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास व आत्मनिर्भरता विकसीत होण्याच्या उद्देशाने शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ‘जागर जाणिवांचा’ हे अभियान राबविले होते. या अभियानात कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटला जिल्हास्तरावरील १ लाखाचा व विद्यापीठ स्तरावरील २ लाखांचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे.
हा पुरस्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.एस.राजे व प्राध्यापक प्रतिनिधींनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते स्वीकारला. पुरस्कार प्रदान केल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील या महाविद्यालयाचे कौतुक केले. तसेच स्त्री सबलीकरणासंदर्भात महाविद्यालयाने यशस्वीपणे राबविलेल्या उपक्रमांची प्रशंसा केली.
स्त्री-पुरूष समानतेच्या संदर्भात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. समानतेची बीजे तरूण-तरूणींमध्ये रूजविण्याच्या दृष्टीने शासनाने ‘जागर जाणिवांचा’ या अभियानाद्वारे सर्व वरिष्ठ महाविद्यालयांना वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम घेण्याविषयी आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देऊन फोंडाघाट महाविद्यालयाने अनेक कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग, व्याख्याने, स्पर्धा, व्यवसाय प्रशिक्षण, जीवनकौशल्ये, चर्चासत्र आदींचे आयोजन केले होते. तसा अहवाल शासनास सादर केला होता. महाविद्यालयाने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल शासनाने घेतली व जिल्ह्यातून आणि विद्यापीठातून प्रथम क्रमांक देऊन महाविद्यालयाचा गौरव केला. या यशाबद्दल फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या संचालक मंडळाने तसेच शिक्षणप्रेमी नागरिकांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुसूदन राजे व समन्वयक डॉ.बालाजी सुरवसे यांचे अभिनंदन केले आहे. हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी महाविद्यालयाचे डॉ. एस. एन. कामत, डॉ. एस. आर. रायबोले, प्रा. डी. बी. ताडेराव, डॉ. आर. बी. पाटील, प्रा. विद्या मोदी, प्रा. व्ही. व्ही. पाटील, प्रा. जे. पी. राणे, प्रा. एम. एम. आखाडे यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)