कणकवली : फोंडाघाटाच्या सुरुवातीलाच खिंडीपासून पहिल्याच युटर्न वरील तीव्र वळणावर फरशीने भरलेला २० चाकी ट्रक पलटी झाला. चालकाचा अंदाज चुकल्याने हा अपघात झाला. यात चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. अल्ताफ गुलाल तांबोळी (वय-३४, रा. पेरले- कराड) असे या जखमी चालकाचे नाव आहे. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले.याबाबत माहिती अशी की, कोल्हापूरकडून फोंड्याच्या दिशेने फरशी भरून हा २० चाकी ट्रक निघाला होता. यावेळी चालकाचा अंदाज चुकल्याने फोंडाघाटाच्या सुरुवातीलाच तीव्र वळणावर ट्रक पलटी झाला. या अपघाताचा मोठा आवाज ऐकून लगतच्या स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर, चालक तांबोळी यांना ट्रक मधून बाहेर काढले. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतुकीतील अडथळा दूर केला.दरम्यान, अलीकडे अवजड वाहनांची वाहतूक यामार्गे वाढल्याने व त्यावर कोणाचाही निर्बंध नसल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. या समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी वाहन चालक तसेच नागरिकांमधून करण्यात येत आहे.
फोंडाघाटात फरशीने भरलेला २० चाकी ट्रक पलटी, चालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 13:43 IST