लोककलाकारांनी एकसंघ व्हाव
By Admin | Updated: August 25, 2014 22:09 IST2014-08-25T21:27:00+5:302014-08-25T22:09:25+5:30
सतीश पाटणकर : वेंगुर्ले येथील लोककलाकारांच्या चर्चासत्रात प्रतिपादने

लोककलाकारांनी एकसंघ व्हाव
वेंगुर्ले : प्रत्येक लोककलेच्या अनेक संस्था कार्यरत असल्यामुळे शासन दरबारी निर्णय घेताना दबाव गट निर्माण होत नाही. या सर्व लोककला सादर करणाऱ्या कलाकार व संस्थांची एकत्रित संस्था कार्यरत झाल्यास शासनावर दबाव निर्माण होऊन या सर्व कलाकारांना अधिक योजनांचा फायदा मिळू शकतो. आज एम. के. गावडे प्रबोधिनी या चर्चासत्राच्या माध्यमातून लोककलाकारांना दिलेली हाक ही लोककला व कलाकार यांच्यासाठी उत्कर्षाचा मार्ग ठरेल, असे प्रतिपादन सतीश पाटणकर यांनी वेंगुर्ले येथे विविध लोककला कलाकारांच्या बैठकीत केले.
वेंगुर्ले येथील साईदरबार सभागृहात एम. के. गावडे प्रबोधिनीच्यावतीने विविध लोककला सादर करणाऱ्या कलाकारांचे एकदिवशीय चर्चासत्र आयोजित केले होेते. या चर्चासत्राचे उद्घाटन मुख्यमंत्री कार्यालयाचे माजी माहिती अधिकारी व लोककलेचे अभ्यासक सतीश पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ दशावतार कलाकार भिकाजी तांबे, अॅड. शशांक मराठे, सामाजिक कार्यकर्ते एम. के. गावडे, ज्येष्ठ दशावतारी कलावंत शिवराम वेतोरकर, आनंद नार्वेकर, नेमळे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आत्माराम राऊळ, एम. के. गावडे, प्रबोधिनीच्या अध्यक्षा प्रज्ञा परब, प्रकाश गडेकर, दिनकर पालव, अंबरिश मांजरेकर, चपई लोकनृत्य कलाकार बाबू कोळेकर, गोफनृत्य कलाकार श्रीकांत चेंदवणकर उपस्थित होते. भिकाजी तांबे यांनी सर्व कलाकारांनी एकसंघ व्हावे, असे आवाहन केले. सिंधुदुर्ग जिल्हा कलाअकादमी स्थापन करण्याचा निर्णय एकमुखाने घेतला. कलाअकादमीला मूर्तस्वरूप आणण्याकरिता बैठक घेऊन कार्यक्रम करण्याचे निश्चित करण्यात आले. स्वागत प्रकाश गडेकर, आभार सुरेश कौलगेकर यांनी मानले. (प्रतिनिधी)
कोकणातील लोककलेला व्यासपीठ निर्माण करून त्या कलेचे आणि कलाकारांचे जतन व संवर्धन करण्याच्या हेतूने कोकणातील सादर होणाऱ्या लोककलाकारांची सिंधुदुर्ग जिल्हा कला अकादमी या संस्थेची स्थापना करण्याचा एकमुखी ठराव या चर्चासत्रात घेण्यात आला.