बिबट्यासोबत बछड्यांचाही वावर
By Admin | Updated: February 2, 2015 00:04 IST2015-02-01T22:33:16+5:302015-02-02T00:04:51+5:30
पाळीव जनावरांचा फडशा : ग्रामस्थांत भीतीचे वातावरण, शिवारातही होतंय दर्शन

बिबट्यासोबत बछड्यांचाही वावर
सणबूर/विंग : कऱ्हाड तालुक्यातील विंग, चचेगाव भागासह पाटण तालुक्यातील कसणी विभागामध्ये बिबट्यांचा वावर वाढला आहे. भक्ष्याच्या शोधात बिबट्या अगदी लोकवस्तीपर्यंत पोहोचला असून, शिवारातही त्याचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या दोन्ही ठिकाणच्या बिबट्यांसोबत बछडेही असल्याचे अनेकांनी पाहिले आहे.
ढेबेवाडी विभागातील कसणी परिसरात गत अनेक महिन्यांपासून बिबट्याचा वावर आहे. त्याच्या हल्ल्यात अनेक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत, तर काही जनावरे जायबंदी झाले आहे. काही दिवसांपूर्वीच शिवारात चरावयास सोडलेल्या पाळीव जनावरांवर बिबट्याने हल्ला केला होता. कसणी येथील शेतकरी आनंदा राजाराम पाटील यांनी आपले बंधू शंकर पाटील यांच्यासह स्वत:ची पाळीव जनावरे गावाच्या हद्दीतील ‘शिवेचा माळ’ परिसरात नागझरी टेक येथे चरावयास नेली होती़ जनावरे चरत असताना सायंकाळच्या सुमारास अचानक झुडपातून आलेल्या बिबट्याने जनावरांवर हल्ला चढवून एका गाईला जागीच ठार केले. यावेळी गुराख्यांनी जोरदार आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने तेथून जंगलाच्या दिशेने पळ काढला़ या घटनेची माहिती ढेबेवाडी येथील वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर हवालदार कोळी, वनरक्षक सविता कर्णे यांनी घटनास्थळी जाऊन मृत जनावराचा पंचनामा केला़कसणी परिसरात बिबट्याचा वावर असून, त्यासोबत दोन बछडे असल्याचेही अनेकांनी पाहिले आहे. गत काही महिन्यापासून पठारावर पाळीव जनावरांवर हल्ले होत असल्याच्या घटना घडत होत्या. मात्र, हे हिंस्त्र प्राण्यांकडून होत असावेत, अशी शंका वाटत होती़ मात्र, आनंदा पाटील यांच्या जनावरांवर झालेल्या हल्ल्यांनंतर परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आह़े़कऱ्हाड तालुक्यातील विंग परिसरातही सध्या बिबट्यासह दोन बछड्यांचा वावर आहे. आगाशिव डोंगराच्या पायथ्याला आनंद एम्पायरच्या शेजारी शनिवारी सकाळी बिबट्या व त्याच्या दोन बछड्यांना ग्रामस्थ शिवाजी पाटील, तानाजी खबाले, सचिन पाटील व बाबूराव पाटील यांनी पाहिले़ रोजच्या व्यायामासाठी हे सर्वजण गेले असताना त्यांना बिबट्याचे दर्शन झाले़ त्यांनी लगेच ही माहिती वनविभागाला दिली. त्यानंतर वनक्षेत्रपाल भरत पाटील, वनपाल एस़ जे़ संकपाळ तसेच वनरक्षक डी़ के़ जाधव यांनी त्याठिकाणी भेट दिली. बिबट्याच्या पायाचे ठसे त्यांनी संकलित केले. (वार्ताहर)