पाच जणांवर गुन्हा दाखल
By Admin | Updated: September 29, 2014 00:02 IST2014-09-28T23:59:47+5:302014-09-29T00:02:55+5:30
तोंडवळीतील घटना : मारहाणप्रकरण

पाच जणांवर गुन्हा दाखल
मालवण : तोंडवळी सापळेबाग येथील समुद्रात पारंपरिक मच्छिमारांपैकी आनंद गोपाळ खडपकर (वय २५, रा. तोंडवळी) यांसह अन्य चारजणांना गैरकायदा जमाव करून मारहाण केल्याप्रकरणी मिनी पर्ससीन मच्छिमार आबा मुणगेकर (रा. आचरा हिर्लेवाडी) यांच्यासह पाच जणांवर मालवण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळाशिल येथील हेमंत तुकाराम खडपकर हे आपली रामेश्वर कृपा ही फायबर पात घेऊन शनिवारी सकाळी ६.३० वाजता आचरा हिर्लेवाडी येथील समुद्रकिनारी मासेमारीसाठी गेले होते. यावेळी त्यांच्याबरोबर आनंद खडपकर, सदानंद कोचरेकर, तुकाराम खडपकर हेही मासेमारीसाठी गेले होते. याचवेळी १० ते १२ मिनी पर्ससीननेट नौका त्या ठिकाणी मच्छिमारी करत होत्या. यावेळी खडपकर यांसह पारंपरिक मच्छिमारांनी मिनी पर्ससीननेटधारकांना अनधिकृत मासेमारी करण्यास अटकाव केला. याचा राग येवून मिनी पर्ससीननेटधारकांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यावेळी झालेल्या बाचाबाचीनंतर खडपकर यांनी आपल्या साथीदारांसह आपली पात तोंडवळी येथील समुद्रात आणली. तोंडवळी सापळेबाग येथे मासेमारी करत असताना ११ वाजण्याच्या दरम्यान खडपकर यांच्या पातीशेजारी तीन मिनी पर्ससीन बोटी आल्या. त्यांच्यापैकी पेडणेकर रापण संघाच्या बोटीतील आबा मुणगेकर यांच्यासह चारजण खडपकर यांच्या पातीवर चढले व त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यावेळी आबा मुणगेकर याने आनंद खडपकर यांना काठीने डोक्यावर मारहाण करून दुखापत केली. तसेच इतरांनी खडपकर यांच्या पातीवरील खलाशांना मारहाण केली. या प्रकरणी आबा मुणगेकर, रियान मुजावर, किशोर तोडणकर यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एल. एल. कचरे, विठ्ठल जोशी, फिरोज तडवी हे अधिक तपास करीत
आहेत. (प्रतिनिधी)