मासेमारी बंद; नौका किनाऱ्यावर
By Admin | Updated: June 1, 2015 23:52 IST2015-06-01T23:50:37+5:302015-06-01T23:52:26+5:30
शासनाचा आदेश : १ जूनपासून प्रथमच अंमलबजावणी

मासेमारी बंद; नौका किनाऱ्यावर
रत्नागिरी : पावसाळा तोंडावर आल्याने शासनाच्या मत्स्य विभागाने यंदा प्रथमच १ जून ते ३१ जुलैपर्यंत दोन महिने खोल समुद्रातील मासेमारी पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्वच मच्छिमारांना दिले आहेत. त्यामुळे यंदाच्या मच्छिमारी हंगामाची इतिश्री झाली आहे. बहुतांश मच्छिमारांनी वारंवार होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे यापूर्वीच नौका शाकारणीला सुरुवात केली आहे.
खोल समुद्रातील मासेमारी पावसाळ्यात बंद असते. मच्छिमारांचा हंगाम १५ आॅगस्ट ते १५ जून या कालावधीत असतो. या कालावधीमध्ये मासेमारी नौका खोल समुद्रामध्ये जाऊन मासेमारी करतात. चालू हंगाम संपण्यासाठी जेमतेम आठवडा शिल्लक राहिला आहे. या हंगामामध्ये मच्छिमारांवर वारंवार वादळी वारे, तसेच वारंवार होणाऱ्या वातावरणातील बदलाचा परिणाम खोल समुद्रातील मासेमारीवर झाल्याचा दिसून येत होता. सततच्या वातावरणातील बदलामुळे मच्छिमारांना अनेक दिवस मासेमारी बंद ठेवावी लागली होती. त्यामुळे नौका मालकांना लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागले होते.
पावसाळ्याच्या कालावधीत माशांचा प्रजननाचा काळ असतो. या कालावधीत मासेमारी केल्यास माशांची अंडी, पिल्ले यांची मरतुक होईल. त्यासाठी या कालावधीत खोल समुद्रातील मासेमारी बंद ठेवणे हितावह असते. त्याचबरोबर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये समुद्र खवळलेला असतो. मोठ-मोठ्या लाटा उसळत असतात. त्यामुळे या कालावधीत मासेमारीला जाणे धोकादायक असते. या कारणाने पावसाळ्यात मासेमारीवर पूर्णत: बंदी घालण्यात आलेली आहे.
१५ जून ते १५ आॅगस्ट या कालावधीमध्ये संपूर्ण मासेमारी बंद असते. मात्र, केंद्र शासनाने आता ही बंदी १ जूनपासून ३१ जुलैपर्यंत घातली आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची सूचना जिल्ह्यातील सर्वच मच्छिमारांना दिली आहे. त्याप्रमाणे बहुतांश मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारीला जाणे बंद केले आहे. शासनाच्या या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली आहे. (शहर वार्ताहर)