मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्यांना सात तास रोखले
By Admin | Updated: July 16, 2015 01:07 IST2015-07-16T01:07:46+5:302015-07-16T01:07:46+5:30
वाद पर्ससीननेटधारकांचा : निवतीतील मिनी पर्ससीनधारक संघटना आक्रमक

मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्यांना सात तास रोखले
म्हापण : मिनी पर्ससीननेट मच्छिमारांवर संशयास्पद बोटीप्रकरणी झालेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी निवती बंदरात दाखल झालेल्या सहायक मत्स्य व्यवसाय अधिकारी सुगंधा चव्हाण व त्यांचे सहकारी अधिकारी डोंगळे यांना बुधवारी निवती बंदरावर अडवून सात तास रोखून धरण्यात आले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर दुपारी एक वाजता अधिकाऱ्यांची मच्छिमारांच्या तावडीतून सुटका झाली.
निवती पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कळसुलकर व हेडकॉन्स्टेबल गिरकर यांनी घटनास्थळी दाखल होऊन मिनी पर्ससीनधारक मच्छिमार नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले व वर्तमानपत्रातील वृत्तामध्ये ज्यांनी आक्षेपार्ह विधाने केली आहेत, त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा, तसेच तुमच्या म्हणण्याचे निवेदन मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्यांना द्या, अशी सूचना केली. त्यानंतर मिनी पर्ससीनधारक संघटनेची बैठक होऊन आपल्या म्हणण्याचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष अशोक सारंग यांनी सहायक मत्स्य व्यवसाय अधिकारी सुगंधा चव्हाण यांना सादर केल्यावर त्यांची अडवलेली गाडी सोडण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये मिनी पर्ससीन संघटनेचे अध्यक्ष अशोक सारंग, मत्स्य व्यावसायिक श्याम सारंग, कमलेश मेतर, प्रल्हाद मेतर, रामू भगत, आदींनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)
बंदर जेटी रस्ता अडविला
सकाळी सहायक मत्स्य व्यवसाय अधिकारी सुगंधा चव्हाण व त्यांचे सहकारी अधिकारी नौकांची तपासणी करण्यासाठी बंदर जेटीकडे गेले. अधिकाऱ्यांची कोंडी करण्यासाठी साडेसातच्या सुमारास मच्छिमारांनी बंदर जेटीकडील रस्त्यावर चिरे आणि लाकडी ओंडके टाकून रस्ता बंद केला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर रस्ता खुला करण्यात आला.