खारेपाटण सोसायटीची प्रथमच निवडणूक

By Admin | Updated: February 25, 2015 00:40 IST2015-02-24T20:50:05+5:302015-02-25T00:40:14+5:30

काँग्रेस विरुद्ध सेनेमध्ये लढत : १३ जागांसाठी २५ जण रिंगणात

For the first time elections of Kharepatan Society | खारेपाटण सोसायटीची प्रथमच निवडणूक

खारेपाटण सोसायटीची प्रथमच निवडणूक

संतोष पाटणकर - खारेपाटण -खारेपाटण गटविकास सेवा सोसायटी लि. खारेपाटण या सहकारी संस्थेची यावर्षीची निवडणूकही रंगतदार होणार असून, संस्थेच्या आजपर्यंतच्या इतिहासात बिनविरोध म्हणून कायम संचालक निवडून जाणाऱ्या या संस्थेला प्रथमच निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. यामध्ये काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी सरळ लढत होणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. एकूण २२४९ सभासदांच्या जोरावर १३ जागांसाठी एकूण २५ उमेदवार आपले भवितव्य अजमावित आहेत. खारेपाटण सोसायटीची निवडणूक ८ मार्चला सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत होणार असून, संपूर्ण खारेपाटण दशक्रोशीचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
खारेपाटण गटविकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीकरिता एकूण ४४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. परंतु, छाननीमध्ये ४ अर्ज बाद झाल,े तर १४ उमेदवारांनी आपले अर्ज निवडणुकीतून मागे घेतले. काँग्रेस पुरस्कृत पॅनलमधून प्रभाकर पोमेडकर हे एकमेव बिनविरोध निवडून आल्यामुळे आता काँग्रेस पक्षाचे एकूण १२ उमेदवार, शिवसेना पक्षाचे एकूण ११ उमेदवार, तर २ अपक्ष उमेदवार, असे मिळून एकूण २५ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे असून, काही विद्यमान संचालकांना मागे टाकून प्रथमच ते आपले भविष्य अजमावताना दिसत आहेत.
काँग्रेस पुरस्कृत पॅनलमधून मनोहर चव्हाण, सूर्यकांत भालेकर, ईस्माईल मुकादम, एकनाथ कोकाटे, रवींद्र जठार, श्रीधर गुरव, विजय देसाई, महेंद्र मण्यार, रिना ब्रह्मदंडे, तृप्ती माळवदे, प्रमोद निग्रे, मंगेश गुरव, आदी १२ उमेदवार निवडणुकीत उभे आहेत. शिवसेना पक्ष पुरस्कृत पॅनलमधून चेतन हुले, रजित ब्रह्मदंडे, शिवाजी राऊत, प्रकाश नर, दयानंद कुडतरकर, शांताराम शेट्ये, महेश कोळसुलकर, मनस्वी कोळसुलकर, प्रदीप इस्वलकर, बाळकृष्ण नाथगोसावी, उदयकुमार बाबरदेसाई असे एकूण ११ उमेदवार निवडणूक लढवित आहेत; तर अपक्ष म्हणून वसीम ठाकूर आणि प्रदीप मोहिरे हे प्रथमच निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.
अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांमध्ये शरद कर्ले, दादा कर्ले, सुधाकर कर्ले, अनिल पेडणेकर, लियाकत काझी, प्रमोद निग्रे, संतोष सरफरे, प्रकाश बाणे, मोहन पगारे, शोभा पाष्टे, तृप्ती माळवदे, भूपेश पाटणकर, मनोहर गोसावी, श्रद्धा देसाई, तर रमेश जामसंडेकर, रफिक नाईक, संतोष गाठे, विजय मण्यार या उमेदवारांचे अर्ज छाननीदरम्यान बाद ठरविण्यात आले. (वार्ताहर)

दोन जागा काँग्रेसच्या पदरात
एकूण १३ जागी संचालक निवडून येणार असून, अनुसूचित जाती प्रवर्गातून प्रभानंद पोमेडकर हे बिनविरोध निवडून आल्यामुळे काँग्रेस पुरस्कृत पॅनेलचा हा प्लस पॉर्इंट मानला जातो. महिलांकरिता २ जागा राखीव असून, शिवसेना पुरस्कृत पॅनेलमध्ये फक्त १ महिला उमेदवार उभी असल्यामुळे जवळजवळ दुसरीही एक जागा काँग्रेस पक्षाला मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. सोसायटीचा आजपर्यंतचा कारभार हा काँग्रेस पुरस्कृत पॅनेलने कित्येक वर्षे सांभाळलेला असून, आजही निवडणुकीला सामोरे जात असताना १३ जागांपैकी जवळजवळ २ जागा या काँग्रेस पक्षाकडे आल्यात जमा असून, उर्वरित ११ जागांपैकी ५ जागा जरी त्यांना मिळाल्या तरी सोसायटीवर काँग्रेस पुरस्कृत पॅनेलच सहज विराजमान होऊ शकते.
अशा आहेत जागा...
या निवडणुकीत अनुसूचित जाती, व्यक्ती १, भटक्या जाती, विमुक्त जाती १, इतर मागासवर्गीय १, महिला वर्ग २, सर्वसाधारण कर्जदार गट ८ असे जागांचे आरक्षण ठेवण्यात आले असून, पुढीलप्रमाणे उमेदवार उभे आहेत. यात अनुसूचित जाती बिनविरोध निवड, भटक्या जाती १ जागा २ उमेदवार, इतर मागासवर्गीय उमेदवार १ जागा ३ उमेदवार, महिला वर्ग २ जागा ३ उमेदवार, सर्वसाधारण कर्जदार गट ८ जागा १७ उमेदवार.

Web Title: For the first time elections of Kharepatan Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.