शासकीय डॉक्टर न येण्याची कारणे शोधा

By Admin | Updated: August 14, 2014 22:39 IST2014-08-14T21:34:39+5:302014-08-14T22:39:02+5:30

आरोग्य समिती सभा : निकिता जाधव यांची मागणी

Find reasons for not getting a government doctor | शासकीय डॉक्टर न येण्याची कारणे शोधा

शासकीय डॉक्टर न येण्याची कारणे शोधा

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. या जिल्ह्यात परजिल्ह्यातून डॉक्टरही यायला तयार होत नाहीत. ही बाब गंभीर असून डॉक्टर या जिल्ह्यात सेवा बजावण्यासाठी का येत नाहीत? याबाबत चिंतन करायची वेळ आता आली आहे. यासाठी त्याचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची समिती नेमा अशी आग्रही मागणी सदस्य निकिता जाधव यांनी आरोग्य समिती सभेत केली.
जिल्हा परिषद आरोग्य समिती सभा बॅ. नाथ पै सभागृहात सभापती प्रकाश कवठणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी समिती सदस्या जान्हवी सावंत, नम्रता हरदास, निकिता जाधव, समिती सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी ए. ए. आठले, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाला ५९ लाख ८६ हजार एवढा निधी प्राप्त झाला. मात्र, या निधीत वाढ व्हावी यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न केले आहेत. ३६ लाख १० हजार रुपये निधी आणखीन वाढवून मिळावा यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
यामध्ये प्रत्येक आरोग्यकेंद्रामध्ये मधुमेह तपासणी यंत्रणेसाठी ५ लाख, प्राथमिक आरोग्यकेंद्रामध्ये संगणक सुविधेसाठी १६ लाख, दुर्धर आजारासाठी १५ लाख, वाहन दुरुस्ती ४ लाख यावर हा वाढीव निधी खर्च होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्यकेंद्र व उपकेंद्र बांधकामांसाठी सन २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये ३ कोटी ८७ लाख रुपये एवढा निधी प्राप्त झाला आहे. त्यापैकी १२ लाख रुपये खर्च झाले असून अद्यापही ३ कोटी ७५ लाख रुपये निधी शिल्लक आहे. हा निधी मार्च २०१५ अखेर खर्च करणे आवश्यक आहे. तर नव्याने या आर्थिक वर्षामध्ये इमारत बांधकामासाठी १ कोटी ९८ लाख रुपये एवढा निधी मंजूर झाला असून तो लवकरच आरोग्य विभागाला प्राप्त होईल अशी माहिती सभागृहात अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
जिल्हा रुग्णालयात पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी नळयोजनेवर ७८ लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र, जिल्हा रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत पाणी येत नसल्यामुळे त्याठिकाणी रुग्णांचे हाल होत आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने राहिलेल्या त्रुटी दूर करून रुग्णांना पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी सदस्या जान्हवी सावंत यांनी केली.जिल्ह्यात मानसिक रुग्णांची संख्या वाढत असून त्याचा ताण जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांवर पडत असून त्याच धर्तीवर प्राथमिक आरोग्यकेंद्रामध्ये रुग्ण तपासण्यात यावेत अशी मागणी सदस्यांनी केली. (प्रतिनिधी)

२७ पासून पथक स्थापन करणार
गणेश चतुर्थीला काही दिवस बाकी राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर चाकरमानी मुंबई, पुणे येथून येणार असून आरोग्याच्या दृष्टीने कोणती कार्यवाही केली आहे असा प्रश्न सदस्यांनी केला. यावर २७ आॅगस्टपासून सर्व बसस्थानक, रेल्वेस्टेशन व सार्वजनिक ठिकाणी आरोग्य विभागामार्फत स्टॉल उभारण्यात येणार असून या कालावधीत कोणत्याही प्रकारची साथ उद्भवू नये यासाठी योग्य ती काळजी घेतली जाईल अशी माहिती आरोग्य अधिकारी आठले यांनी दिली. आवश्यक तो औषध साठा ठेवा व प्रवाशांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष द्या, असे आदेश सभापती प्रकाश कवठणकर यांनी दिले.
कुष्ठरोगाचे नव्याने २८ रुग्ण आढळले
जुलैअखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने २८ रुग्ण आढळले असून यात एका बालकाचाही समावेश आहे. या सर्वांना औषधोपचाराखाली ठेवण्यात आले आहे. तर क्षयरोगाचे नव्याने २४ रुग्ण आढळले असून सध्या ५३१ रुग्ण उपचार घेत आहेत.

Web Title: Find reasons for not getting a government doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.