केसरकरांना पक्षनिधीतून आर्थिक मदत दिली, पुन्हा खोटे आरोप केल्यास..; विनायक राऊतांचा इशारा

By अनंत खं.जाधव | Published: February 20, 2024 03:50 PM2024-02-20T15:50:07+5:302024-02-20T15:50:35+5:30

'माझ्या विरोधात राणेंनी उभे राहून दाखवावे'

Financial assistance given to Deepak Kesarkar from party funds, if false accusations are made again; Warning of MP Vinayak Raut | केसरकरांना पक्षनिधीतून आर्थिक मदत दिली, पुन्हा खोटे आरोप केल्यास..; विनायक राऊतांचा इशारा

केसरकरांना पक्षनिधीतून आर्थिक मदत दिली, पुन्हा खोटे आरोप केल्यास..; विनायक राऊतांचा इशारा

सावंतवाडी : शिवसेनेला एक कोटी दिले, असे सांगणार्‍या मंत्री दीपक केसरकर यांना 2019 च्या निवडणुकी वेळी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी परतफेडीच्या अटीवर पक्षनिधीतून अर्थिक मदत दिली होती. ती रक्कम  गोव्याच्या कोणत्या हॉटेलात स्वीकारली तसेच त्यातील किती पैसे परत केले हे जाहीर करायला लावू नका. पुन्हा खोटे आरोप केले तर गप्प बसणार नाही येथील गांधी चौकात सभा घेऊन बुरखा फाडण्यात येईल असा इशारा  शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी मंत्री केसरकर यांना दिला आहे.

ते मंगळवारी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी सर्पक प्रमुख शैलेश परब, जिल्हाप्रमुख संजय पडते, रूपेश राऊळ, बाळा गावडे, मदार शिरसाट, मायकल डिसोझा, चद्रंकांत कासार, सुनिल गावडे, आबा सावंत, अनुप नाईक उपस्थित होते.

शिवसेनेने मंत्रीपदासाठी आपल्याकडे कोट्यवधीची मागणी केली होती, असा आरोप करणार्‍या मंत्री दीपक केसरकर यांच्या आरोपांना खासदार राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. राऊत म्हणाले, 2014 च्या निवडणुकीत मला निवडून आणण्याची भाषा करणार्‍या मंत्री केसरकरांनी आता शिवसेनेचाच खासदार निवडून येणार आहे, हे लक्षात आल्यानंतर संधी साधली. परंतु आम्ही काही कृतघ्न होणार नाही. त्यांनी केलेल्या मदतीची आम्हाला जाणीव आहे. त्यावेळी शैलेश परब यांचे आमदारकीसाठी नाव चर्चेत असताना त्या ठिकाणी तुम्हाला संधी दिली, हे विसरलात का? त्यावेळी आभार मानलेत मग आता खोटे का बोलत आहात असा सवाल खासदार राऊत यांनी केला.

मंत्री केसरकर साईभक्त म्हणून सांगत आहेत मात्र आता ते खोटे बोलतात. अडचणीच्या वेळी मंत्री केसरकर यांना 2019 च्या निवडणुकीत परतफेड करण्याच्या अटीवर ठाकरेंनी तब्बल दोन वेळा पैसे दिले. परंतु केसरकर यांनी अर्धे पैसे परत केले, अर्धे अजूनही परत केलेच नाहीत. त्यामुळे राहिलेले पैसे आम्ही मागणार नाही. पण खोटे आरोप केले तर सोडणार ही नाही असा इशारा खासदार राऊत यांनी दिला. 

माझ्या विरोधात राणे यांनी उभे राहून दाखवावे

माझ्या विरोधात ऊभे राहून आपला पराभव करुन घ्यायचा असेल तरच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवावी तसेच मंत्री दीपक केसरकर यांना लोकसभा लढविण्याची इच्छा आहे त्यामुळे अन्य लोकांची नावे पुढे करुन ते पदराआड राहून बाण सोडत आहेत असा आरोप खासदार राऊत यांनी केला.

Web Title: Financial assistance given to Deepak Kesarkar from party funds, if false accusations are made again; Warning of MP Vinayak Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.