वित्त समिती सभेत सत्ताधाऱ्यांनाच घरचा आहेर
By Admin | Updated: September 20, 2014 00:36 IST2014-09-19T23:06:08+5:302014-09-20T00:36:37+5:30
सुरेश ढवळ बनले विरोधक : जिल्हा परिषद सदस्यांच्या स्वनिधीवरून आक्रमक

वित्त समिती सभेत सत्ताधाऱ्यांनाच घरचा आहेर
सिंधुदुर्गनगरी : मतदारसंघाच्या विकासकामांसाठी जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणाऱ्या स्वनिधीमध्येही पूर्णपणे तफावत आढळत असून जिल्हा परिषदेमधील प्रमुख ‘मानकरी’च स्वत:च्या मतदारसंघात जास्तीत जास्त स्वनिधी पळवतात, असा आरोप खुद्द सत्ताधारी सदस्य सुरेश ढवळ यांनी करीत सत्ताधाऱ्यांनाच घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे ढवळ यांनी विरोधकांची भूमिका निभावल्याचे सभागृहात दिसून आले.
जिल्हा परिषद वित्त समितीची सभा सभापती भगवान फाटक यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात झाली. यावेळी समिती सदस्य सुरेश ढवळ, सुभाष चव्हाण, समिती सचिव मारूती कांबळे, अधिकारी, खातेप्रमुख आदी उपस्थित होते. शासनाने ‘विकास निधी’ या हेडखाली निधी खर्च करण्यास नकार दिल्याने तो स्वनिधी या हेडखाली खर्च होणार आहे, अशी माहिती सभागृहात कांबळे यांनी दिली.
यावर आक्रमक झालेले सुरेश ढवळ यांनी स्वनिधी तरी कुठे समान वाटप केला जातो, असा सनसनी सवाल अधिकाऱ्यांना करीत धारेवर धरले.
वित्त समिती ठरावाला ग्रामपंचायतीकडून केराची टोपली
प्रत्येक मतदारसंघात एक याप्रमाणे गरीबांचे घर दुरूस्तीबाबत प्रस्ताव मंजूर करावेत, असा ठराव १९ आॅगस्टच्या सभेत घेतला गेला असतानाही ग्रामपंचायत विभागाने या ठरावाला केराची टोपली दाखवली आहे. केवळ एकट्या कुडाळ तालुक्यात गरीबांची घर दुरूस्ती यासाठीचे ८ प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याने सुरेश ढवळ यांनी सभागृहात नाराजी व्यक्त करीत वित्त समिती सभेला किंमतच नसल्याचे यावेळी सांगितले. असे असेल तर आम्ही मिटींगलाच येणार नसल्याचे जाहीर केले.
जमा-खर्चास मान्यता दिली नाही
सभागृहात जमा-खर्चाला मान्यता मिळण्याबाबत इतिवृत्त वाचण्यात आले. त्यात गरीबांची घरे दुरूस्त करण्यासाठी झालेल्या खर्चाला सभागृहाने मंजुरी दिली नाही. त्यामुळे गरीबांची घरे दुरूस्ती करणे हा विषय पेटण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
सर्व निधी खर्च करा
१३व्या वित्त आयोगाअंतर्गत सर्व रक्कम येत्या मार्च महिन्यापर्यंत खर्च होणे आवश्यक आहे. निधी खर्च न झाल्यास जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नावरील दायित्वावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचा निधी अखर्चित राहिल्यास तो शासनाला जाणार आहे. त्यामुळे निधी वेळेत खर्च करा, असे आवाहनही यावेळी सदस्यांना वित्त अधिकारी मारूती कांबळे यांनी केले.
उठायचं अन्... सरळ बाहेर जायचं
आजच्या वित्त समिती सभेत गरीबांची घर दुरूस्ती या हेडखाली महत्त्वपूर्ण चर्चा सुरू असते. वित्त विभागातीलच काही अधिकारी व इतर एक-दोन खातेप्रमुख मोबाईलवर तसेच आपापसात चर्चा करीत होते. हा सर्व प्रकार वित्त अधिकारी कांबळे यांच्या निदर्शनास येताच कांबळे यांनी संबंधितांना चांगलेच फटकारत ज्यांना सभागृहात बोलायचे आहे त्यांनी उठायचं आणि सरळ बाहेर जायचं असा सल्ला दिला. नंतर या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला.