चौपदरीकरणासाठी जमीन मोजणी अंतिम टप्प्यात

By Admin | Updated: August 1, 2015 00:22 IST2015-07-31T23:12:58+5:302015-08-01T00:22:42+5:30

मुंबई-गोवा महामार्ग : संगमेश्वर जवळ होणार उड्डाणपूल; चिपळूण, पाली, लांजा, राजापुरात पर्यायी मार्ग

Final phase of counting the land for four-dimensional | चौपदरीकरणासाठी जमीन मोजणी अंतिम टप्प्यात

चौपदरीकरणासाठी जमीन मोजणी अंतिम टप्प्यात

प्रकाश वराडकर- रत्नागिरी -मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या वाढीव जमीन मोजणीचे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काम अंतिम टप्प्यात आले आहे. सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, पाली व लांजा या बाजारपेठांतून महामार्ग चौपदरीकरणाला विरोध झाल्याने शहराबाहेरून पर्यायी मार्ग (बायपास रोड), तर संगमेश्वरमध्ये उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जमीन मोजणीचे काम अंतिम टप्प्यात आहे.
गेल्या दीड दशकांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची मागणी केली जात होती. या मार्गावर आजवर शेकडो प्रवाशांना अपघातात प्राण गमवावे लागले आहेत. ‘डेड ट्रॅक’ अशी भयावह ओळख झालेल्या या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी पत्रकारांनी विशेष पुढाकार घेतला. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रत्नागिरी दौऱ्यावेळी महामार्ग चौपदरीकरणाची घोषणा केली. त्यासाठी पाच हजार कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच जमीन मोजणीचे आदेशही दिले.
पनवेल, महाड, पणजी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ (जुना क्र. १७) असून, रस्ते वाहतूूक व महामार्ग मंत्रालयाने या मार्गापैकी इंदापूर ते झाराप या रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील ३६६.१७० किलोमीटर्स भागाच्या चौपदरीकरण कामाला २१ जून २०१३, ४ जून २०१३ व ६ जून २०१३ अन्वये मान्यता दिली होती. इंदापूर ते कशेडी पायथा हा ८४.०० ते १६१.०० किलोमीटरचा पहिला टप्पा आहे. कशेडी पायथा ते संगमेश्वर ओझरखोल हा १६१ ते २६५ किलोमीटरचा टप्पा आहे. संगमेश्वर ओझरखोेल ते राजापूर हा २६५ ते ३५१ किलोमीटर अंतराचा तिसरा टप्पा आहे. राजापूर ते झाराप (गोवा) हा ३५१ ते ४५० किलोमीटर अंतराचा चौथा टप्पा आहे. (प्रतिनिधी)
आहे.


बाजारपेठा ओस पडणार ?
चिपळूण, पाली, लांजा या बाजारपेठांमधून चौपदरीकरणास विरोध झाल्याने बाजारपेठेबाहेरून महामार्गासाठी पर्यायी जागेतून चौपदरीकरण होणार आहे. संगमेश्वरमध्येही उड्डाण पूल उभारला जाणार आहे. त्यामुळे चौपदरीकरणानंतर या बाजारपेठात बाहेरून वाहने न येता थेट वळसा घालून पुढील मुक्कामाला जाणार आहेत. परिणामी या बाजारपेठा ओस पडण्याची भीती व्यक्त होत आहे. लांजा बाजारपेठेत तर ५० टक्के उलाढाल ही बाहेरून वाहनाने येणाऱ्यांकडून होत असल्याचीही चर्चा



३४ हजार झाडांची कत्तल
रायगड जिल्ह्यातील ४५, रत्नागिरीतील १०४, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४० मिळून महामार्ग चौपदरीकरणासाठी या तिन्ही जिल्ह्यांतील १८९ गावांतील वाढीव जमीन घेतली जाणार आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या जमिनीखालील केबल्स, रोहित्रे, भारत संचार निगमचे खांब, जलवाहिनी यांचे स्थलांतर करावे लागणार आहे. वनविभागाची चौपदरीकरणाच्या जागेत येणारी ३४,०६५ झाडे तोडावी लागणार आहेत. --राजापूरचा विषय केंद्राकडे
जिल्ह्यात राजापूरमध्ये काही धार्मिक प्रार्थनास्थळांची काही जागा तसेच हनुमान मंदिर पूर्णत: चौपदरीकरणात जाणार असल्याने हे मंदिर वाचविण्याची स्थानिकांची आग्रही मागणी आहे. त्यामुळे याठिकाणी बायपास रोडचा प्रस्ताव विचाराधीन आहे. मात्र, याबाबतचा अहवाल केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विभाग मंत्रालयाकडे निर्णयासाठी पाठविण्यात आला आहे. त्यामुळे राजापूरबाबतचा निर्णय प्रतीक्षेत आहे. तरीही या ठिकाणी पर्यायी मार्गाचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

Web Title: Final phase of counting the land for four-dimensional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.