दहशतवादाविरूद्ध लढाई सुरूच राहणार
By Admin | Updated: July 30, 2014 22:58 IST2014-07-30T22:53:14+5:302014-07-30T22:58:42+5:30
दीपक केसरकर : कणकवलीत शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक

दहशतवादाविरूद्ध लढाई सुरूच राहणार
कणकवली : विकासाबाबत स्पर्धा करायची असेल तर मी कधीही तयार आहे. मात्र, कोकणातील जनतेचा अपमान कधीही सहन करणार नाही. आगामी विधानसभा निवडणूक ही दहशतवादाविरूद्धची निकराची लढाई आहे. ही लढाई अशीच सुरू राहणार असे मत आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.
दीपक केसरकर यांच्या शिवसेना प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सावंतवाडीत येत आहेत. यावेळी घेण्यात येणाऱ्या मेळाव्याच्या नियोजनासाठी येथील शासकीय विश्रामगृहात कणकवली तालुका शिवसेनेच्या बैठकीचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते.
या बैठकीनंतर केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक, उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, तालुकाप्रमुख सचिन सावंत, नगरसेवक सुशांत नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते. आमदार केसरकर म्हणाले, कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची पक्षसंघटना मजबूत आहे. त्यामुळे या मतदारसंघातून युतीच्यावतीने निवडणूक लढविणारे आमदार प्रमोद जठार यांच्या पाठीशी शिवसैनिकांची पूर्ण ताकद उभी केली जाईल. यापूर्वीही जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी राष्ट्रवादी व शिवसेनेने आघाडी करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय संपादन केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कोकणावर अतोनात प्रेम होते. त्यामुळे कोकणातील दोन मुख्यमंत्री त्यांनी बनविले. मात्र बाळासाहेबांना त्रास देणाऱ्यांना आता जनताच धडा शिकवेल व बाळासाहेब ठाकरेंवरील आपले प्रेम सिद्ध करेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनाही नारायण राणे यांनी त्रास दिला आहे. त्यामुळे हे सर्वजण आमच्याबरोबर असतील. राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना बरोबरीची वागणूक दिली जाईल असे जिल्हाप्रमुखांनी सांगितले आहे. त्यामुळे शिवसेना अधिक बळकटीसाठी प्रयत्न केले जातील.
माझी जनतेशी बांधिलकी असून मी कोणाच्या अंगावर जात नाही. मात्र कोण अंगावर आले तर शिंगावर घेतल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे माझ्यावर टीका करणाऱ्यांनी प्रथम माझी बरोबरी साधावी आणि त्यानंतरच टीका करावी, असे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना केसरकर यांनी सांगितले. (वार्ताहर)