फेस्टिव्हल संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवणार
By Admin | Updated: January 3, 2015 00:14 IST2015-01-02T23:13:21+5:302015-01-03T00:14:08+5:30
दिगंबर नाईक : मालगुंड बीच फेस्टिव्हलचे सूप वाजले

फेस्टिव्हल संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवणार
गणपतीपुळे : मालगुंड हा निसर्गसौंदर्याने नटलेला प्रदेश आहे. त्यामुळे हा बीच फेस्टिव्हल संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवणार असल्याचे प्रतिपादन सिने अभिनेता दिगंबर नाईक यांनी केले. मालगुंड येथील बीच फेस्टिव्हलच्या सांगता समारंभप्रसंगी ते बोलत होते.मालगुंड ग्रामपंचायत व पर्यटन समिती, मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सागरी महोत्सवाची सांगता नुकतीच झाली. यावेळी विनोदी अभिनेता दिगंबर नाईक उपस्थित होते. नाईक पुढे म्हणाले की, गतवर्षीपासून सुरू झालेल्या या महोत्सवात येथील पर्यटन समितीने आपल्याला नाटक करण्याची संधी प्राप्त करून दिली आणि तेव्हापासून मिळालेले येथील सर्वच सदस्यांचे प्रेम कायम आहे. हे प्रेम आपण कधीही विसरणार नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने कोकणात नाट्यप्रयोग करताना मालगुंड या शांत रमणीय ठिकाणी आपल्याला अधिकाधिक यायला आवडेल, असे नाईक म्हणाले.
यावेळी नाईक यांचा मालगुंड ग्रामपंचायत व पर्यटन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने समितीचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांनाही गौरवण्यात आले.
त्यांचा समितीचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे, सदस्या सोनिया शिंदे, मालगुंड सरपंच साधना साळवी, आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त स्मिता जोशी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. या सांगता सोहळ्यात नवीन वर्षाचे स्वागत फटाक्यांच्या जोरदार आतषबाजीत करण्यात आले. यावेळी उपस्थित प्रेक्षक आणि पर्यटकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात नवीन वर्षांचे स्वागत केले.
मालगुंड येथे आयोजित या बीच महोत्सवाला नागरिक आणि पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. या महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळाला. महोत्सवात पारंपरिक जाखडी नृत्य, मी संगमेश्वरी बोलतोय हा हास्यसम्राट आनंद बोंद्रे यांचा कार्यक्रम, जुन्या-नव्या गाण्यांची मैफल, या व्याकूळ संध्यासमयी हा राज्य नाट्य स्पर्धेतील तरल नाट्यानुभव, विनोदी अभिनेता दिगंबर नाईक दिग्दर्शित तुफान विनोदी मालवणी नाटक ‘अर्धी मस्ती-अर्धा ढाँग’ व साईश्रध्दा, मुंबई प्रस्तुत ‘मायबाप-माय मराठी’ हा आॅर्केस्ट्रा असे विविध कार्यक्रम पार पडले. (वार्ताहर)