राजेशाही थाटातील उत्सव
By Admin | Updated: September 4, 2014 00:08 IST2014-09-03T23:01:53+5:302014-09-04T00:08:46+5:30
ओटवणेतील कुळाचा गणपती : गावरहाटीतील धार्मिकतेचा वारसा

राजेशाही थाटातील उत्सव
ओटवणे : सावंतवाडी संस्थानचे मूळ असलेल्या ओटवणे गावाला संस्थानाच्या विविध राजेशाही रितीरिवाजांची परंपरा लाभली आहे. येथील कुळघराकडे विराजमान होणाऱ्या आणि ‘कुळाचा गणपती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेशमूर्तीला राजेशाही संस्थानबरोबर गावरहाटीतील धार्मिकतेचा वारसा लाभला आहे.
या गणपतीची मूर्ती घडविण्यापासून ते विसर्जनापर्यंतचे सर्व धार्मिक रितीरिवाज आजही परंपरेप्रमाणे जपले जातात. गावात प्रमुख मानकऱ्यांच्या घरी विराजमान होणाऱ्या या गणपतीला ‘कुळाचा गणपती’ तसेच ‘गावाचा गणपती’ म्हणूनही संबोधले जाते.
मातीतून मूर्ती घडविल्यानंतर हरितालिकेच्या, म्हणजे चतुर्थीच्या आदल्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत मूर्तीचे रंगकाम केले जाते. सूर्यादर्यापूर्वी हे रंगकाम आटोपते घ्यावे लागते.
त्यानंतर प्रमुख गावकरी मानकऱ्यांच्या उपस्थितीत सूर्योदयानंंतर तळी ठेवून पूजा केल्यानंतर या मूर्तीची ‘नजर उघडण्याचे’ काम केले जाते. अशी या गणपतीची जागृत धार्मिकता आहे. या कुळाच्या गणपतीचे सावंतवाडी राजघराण्याचे नातेही जोडले गेले होते. यावेळी संस्थानकाळात या गणपतीसाठी ‘दीड रुपया’ एवढी आर्थिक बिदाई कूळ मानकऱ्याकडे दिली जात असे, असा उल्लेख आढळतो. रक्तवर्ण स्वरुपाच्या या मूर्तीचे पावित्र्य गांभीर्याने जपावे लागते. पूजाअर्चा आदी धार्मिक परंपरेबरोबरच स्वच्छता सुशोभित तेवढीच कठोररित्या जपावी लागते. या गणपतीला गाव रहाटीतील परंपरेप्रमाणे विशेष धार्मिकतेचा मान असल्याने ढोलवाद्यांची नौबत केली जाते. मूर्ती विसर्जनासाठी ढोल ताशांच्या गजरात पालखी मिरवणुकीने नेली जाते. ती वाहनाने नेण्याचा प्रयत्न केल्यास विसर्जनास अडचणी निर्माण होतात, असे जाणकार सांगतात.
या गणपतीचे विसर्जन सावंतवाडी संस्थानचे मूळ राजे श्रीमंत खेमसावंत भोसले यांच्या समाधी स्थळावरील तेरेखोल नदीच्या त्रिवेणी संगमावरच परंपरेनुसार केले जाते. हा गावाचा-कुळाचा नवसाला पावणारा गणपती असल्याने गावातील भाविक या गणपतीचे आवर्जून दर्शन
घेतात. (प्रतिनिधी)