पहिल्या मुलीला जन्म देणाऱ्या कुटुंबांचा दहिबाव येथे सत्कार
By Admin | Updated: July 8, 2015 21:43 IST2015-07-08T21:43:34+5:302015-07-08T21:43:34+5:30
नवीन पायंडा : तंटामुक्ती समितीचा उपक्रम

पहिल्या मुलीला जन्म देणाऱ्या कुटुंबांचा दहिबाव येथे सत्कार
मिठबांव : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील कौतुकाची थाप ही भावी पिढी घडविण्यासाठी आवश्यक असून गुणवंत विद्यार्थ्यांसोबतच पहिल्या मुलीला जन्म देणाऱ्या कुटुंबांचा सत्कार करून दहिबाव बागमळा गावाने एक नवीन पायंडा पाडल्याचे प्रतिपादन किंजवडे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक माधव ओगले यांनी केले. दहिबांव ग्रामपंचायत तंटामुक्ती समितीमार्फत श्री देव महादेश्वर मंदिरात आयोजित सत्कार समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी व्यासपीठावर सरपंच शरद परब, उपसरपंच मयूरी घाडी, माजी सरपंच प्रफुल्ल गोरे, तंटामुक्ती अध्यक्ष विलास तारकर, तंटामुक्ती उपाध्यक्ष विठ्ठल अदम, ग्रामसेवक गुणवंत पाटील, दहिबांव पोलीस पाटील संजय परब, बागमळा पोलीस पाटील दिलीप शेट्ये, पाणलोट अध्यक्ष परेश रुमडे, दिनेश खोत आदी मान्यवर उपस्थित होते.दहिबांव महादेश्वर मंदिर येथे इयत्ता दहावी, बारावीमध्ये यश प्राप्त विद्यार्थी, इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा यशप्राप्त विद्यार्थी तसेच प्रथमच मुलीला जन्म देणाऱ्या कुटुंबाचा सत्कार यावेळी करण्यात आला. रोख रक्कम व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन सहायक शिक्षक दिनेश दळवी यांनी, तर उपस्थितांचे आभार सहायक शिक्षक रामदास तांबे यांनी मानले. (वार्ताहर)