साथरोग पसरण्याची भीती

By Admin | Updated: October 30, 2014 00:46 IST2014-10-30T00:44:31+5:302014-10-30T00:46:37+5:30

आरोग्य विभाग सतर्क : बदलत्या वातावरणाचा फटका

Fear of spread of diseases | साथरोग पसरण्याची भीती

साथरोग पसरण्याची भीती

रजनीकांत कदम - कुडाळ
परतीचा पाऊस आणि बदललेल्या वातावरणामुळे साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता असल्याने आरोग्य यंत्रणेबरोबरच जनतेनेही सतर्क राहून आरोग्याची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पावसाचे चार महिने संपून गेले, तरीही अधूनमधून पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे.
परतीच्या पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात सगळीकडे साचते. त्यामुळे तापमानात कधी वाढ तर कधी थंडी असे बदल घडत राहतात. कधी पाऊस, कधी कडक ऊन तर कधी थंडी असे वातावरण वारंवार बदलत असल्याने याचा परिणाम जनजीवनावर होत आहे. यासाठी आरोग्य विभागाबरोबरच जनतेनेही सतर्क राहून साथीच्या रोगांपासून दूर राहण्याबाबत उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.
परतीच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले तर आहेच, शिवाय सर्वात मोठा धोका आहे तो म्हणजे साथीचे रोग पसरण्याचा. जिकडे तिकडे साचलेल्या डबक्यांमध्ये डासांची पैदास आताच्या उबदार वातावरणाुळे जोर धरणार असून या डासांमार्फत ताप किंवा अन्य साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. सद्यस्थितीत डासांचे प्रमाण वाढले असूनही यावर उपाययोजना करण्याबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे दिसत आहे.
कुडाळ शहराचाच विचार करता, शहरात अनेक ठिकाणी तुंबलेले गटार, वाढता कचरा, घाणीचे साम्राज्य हे डासांच्या उत्पत्तीचे मुख्य स्त्रोत ठिकठिकाणी दिसत आहेत. तरीही डासांच्या पैदासीला आळा घालण्यासाठी अथवा डासांचे निर्मूलन करण्यासाठी कोणतीही मोहीम हाती घेतलेली दिसत नाही.
बदलत्या वातावरणामुळे शहराला डेंग्यू तापाच्या साथीला तोंड द्यावे लागले आहे. अशाचप्रकारचे रोग येण्यापूर्वीच उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.
‘ड्राय डे’ पाळला जात नाही
पाऊस पडून गेल्यानंतर डबकी आणि साचलेल्या पाण्याचे स्त्रोत नष्ट करून डासांची पैदास थांबविण्यासाठी शासनातर्फे ‘ड्राय डे’चे आयोजन केले जाते. परंतु ग्रामपंचायत पातळीवर या ‘ड्राय डे’चे पालन योग्य पद्धतीने केले जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच साथरोग नियंत्रणात आणणे अवघड होत आहे.

Web Title: Fear of spread of diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.