चालत्या दुचाकीवर आंब्याचे झाड कोसळल्याने बाप-लेक जखमी

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 25, 2025 23:01 IST2025-03-25T23:00:00+5:302025-03-25T23:01:36+5:30

अवकाळी पावसाचा परिणाम ;मांगेली कुसगेवाडी येथील दुर्घटना

Father and daughter injured after mango tree falls on moving bike | चालत्या दुचाकीवर आंब्याचे झाड कोसळल्याने बाप-लेक जखमी

चालत्या दुचाकीवर आंब्याचे झाड कोसळल्याने बाप-लेक जखमी

महेश सरनाईक 

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) :
मांगेली कुसगेवाडी येथे काजू बागायतीमधून घरी परतत असताना वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या अवकाळी पावसात आंब्याचे झाड दुचाकीवर पडून बाप - लेक गंभीर जखमी होण्याची दुर्घटना घडली.यात मुलगी गौरी अरविंद गवस ( ११ ) हीला गंभीर दुखापत झाल्याने तिला उपचारासाठी म्हापसा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले  तर वडील अरविंद गवस ( ४२) हे किरकोळ जखमी झाल्याने त्यांच्यावर साटेली- भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले 

 गेल्या काही दिवसात तालुक्यात  कमालीची उष्णता वाढली होती. वाढत्या गरमीमुळे अंगाची लाही लाही होत असताना मंगळवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दोडामार्ग तालुक्यात हजेरी लावली. अनेक ठिकाणी पडझडीचे प्रकारही घडले.जवळपास दोन तासाहून अधिक काळ अवकाळी पाऊस बरसला.मात्र या अवकाळी पावसाचा फटका काजू बागेत काजू गोळा करण्यासाठी गेलेल्या मांगेली कुसगेवाडी येथील बाप - लेकीला बसला. अरविंद गवस हे आपली मुलगी गौरी हिला घेऊन काजू बागेत काजू गोळा करण्यासाठी गेले होते. मात्र अचानक  ढग दाटून येऊन वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे काजू बागेतुन त्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला .

दुचाकीवर बसून ते घरी येत असताना घराजवळचे एक आंब्याचे झाड त्यांच्या चालत्या दुचाकीवर मोडून पडले आणि ती दोघेही बाप - लेक त्याखाली चिरडले गेले. यातून कशी बशी सुटका करून घेत अरविंद गवस यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. लागलीच गावकरी त्याठिकाणी धावून गेले व त्यांनी दोघांनाही बाहेर काढले.यात गौरी हिला गंभीर मार लागला तर तिचे वडिल किरकोळ जखमी झाले. दोघांनाही साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र गौरीची प्रकृती गंभीर असल्याने तिला अधिक उपचारासाठी गोवा-म्हापसा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

Web Title: Father and daughter injured after mango tree falls on moving bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.