जीवघेणा प्रवास टळणार
By Admin | Updated: November 28, 2014 23:54 IST2014-11-28T22:00:31+5:302014-11-28T23:54:24+5:30
ग्रामस्थांमध्ये समाधान : तिलारी नदीवर परमे येथे बांधला पूल

जीवघेणा प्रवास टळणार
गजानन बोंदे्र - साटेली भेडशी -गेली अनेक वर्षे भेडशी-परमे येथे जाणारा रस्ता पावसाळ्यात बंद असल्यामुळे नदी पार करण्यासाठी ग्रामस्थांना होडीचा जीवघेणा प्रवास करावा लागत होता. परंतु तिलारी नदीवर परमे येथे झालेल्या पुलामुळे परमे आणि घोटगे येथील लोकांची चांगली सोय झाली आहे. हा मार्ग आता बारमाही सुरू झाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
भेडशी ते परमे हे अवघे तीन ते चार किलोमीटरचे अंतर आहे. परंतु कालव्याच्या पुलाचा वापर केल्यास हेच अंतर दहा ते बारा किलोमीटर होत असे. शिवाय भोमवाडीमार्गे जाणाऱ्या कालव्याचा रस्ता चिखलय आणि धोकादायक होता. रात्रीच्यावेळी या मार्गावरून एकट्याने प्रवास करणे फारच धोकादायक होते. परंतु यावर्षी पावसाळ्यात झालेला परमे येथील परमे पूल म्हणजे घोटगे-परमेवासीयांसाठी वरदानच ठरला आहे. मागील काही वर्षे या परिसरातील लोक नदी पार करण्यासाठी तिलारी प्रकल्पांतर्गत बांधलेल्या कॉजवेचा वापर करीत. त्यावेळी या कॉजवेवरून अनेक वाहने तसेच माणसे वाहून गेल्याचे प्रकार घडले होते. कॉजवेवर पाणी कमी असल्याचे समजून त्यातून चालत जाण्याचा अथवा वाहन हाकण्याचा प्रयत्न अनेकांच्या जीवावर बेतला आहे. परंतु आज येथे झालेल्या पुलामुळे परिसरातील लोकांना नदी पार करणे फारच सोयीस्कर आणि सुरक्षित झाले आहे.
पुलाच्या दोन्ही बाजूला पावसाळ्यात काढता येण्यासारखे संरक्षक पाईप बसविणे महत्त्वाचे आहे. पुलाला जोडणारा दोन्ही बाजूचा रस्ता उंचावर आहे. घोटगे येथे जाणाऱ्या रस्त्याला पुलापासून जवळच तीव्र वळण आहे. त्यामुळे या वळणावर सुरक्षेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करण्याची फार आवश्यकता आहे. अन्यथा भविष्यात हे ठिकाण अपघातांसाठी निमंत्रण ठरण्याची भीती ग्रामस्थ आणि वाहनचालकांमधून व्यक्त होत आहे. पूर्वी दुथडी वाहणाऱ्या तिलारी नदीतून घोटगे-परमे येथील विद्यार्थी शाळा, कॉलेजमध्ये येण्यासाठी होडीतून जीवघेणा प्रवास करीत असत. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणासाठी येथील मुलांना भेडशी येथे यावे लागत असल्याने होडीचा प्रवास अपरिहार्य होता. तसेच गावातील लोकांनाही साटेली-भेडशी येथे येण्यासाठी होडीतून यावे लागत असे. परमे येथे झालेल्या पुलामुळे होडीचा प्रवास आता टळला असून याबाबत ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. मात्र, रखडलेले काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
काम अपूर्ण
घोटगे-परमे हा भाग दुर्गम असला, तरी आज या पुलामुळे या दोन्ही गावांना विकासाची नवी संधी मिळाली आहे. या संधीचा फायदा परिसरातील लोकांनी घेऊन आपल्यासह परिसराचा संपूर्ण विकास करून घ्यायला हवा. दरम्यान, या पुलामुळे होडीचा जीवघेणा प्रवास टळला असला, तरी पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम घाईगडबडीत करून रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात आल्याने काही काम आजही अपूर्णावस्थेत आहे.