शिलाई मशिनसाठी उपोषण
By Admin | Updated: February 26, 2015 00:08 IST2015-02-25T23:22:46+5:302015-02-26T00:08:50+5:30
वर्दे, कडावल येथील महिला : दहा टक्के रक्कम परत देण्याची मागणी

शिलाई मशिनसाठी उपोषण
ओरोस : कुडाळ तालुक्यातील वर्दे, कडावल येथील महिलांना तीन वर्षापूर्वी उत्कृष्ट दर्जाची दिलेली शिलाई मशिन तीन वर्षानंतर खराब झाल्याने भरलेली दहा टक्के रक्कम आर्थिक भुर्दंडासह परत द्यावी, या मागणीसाठी जिल्हा परिषद भवनासमोर बुधवारी महिलांनी उपोषण सुरू केले आहे.महिला व बालकल्याण विभागामार्फत कुडाळ येथील वर्दे, कडावल येथील महिलांना सन २०१२-१३ या आर्थिक वर्षामध्ये शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले होते. वेगवेगळ््या तालुक्यातील १५-१८ याप्रमाणे जिल्ह्यातील लाभार्थींना या मशिनचे वाटप केले गेले. मात्र, या आर्थिक वर्षात ज्या पुरवठाधारकांकडून शिलाई मशिन खरेदी केल्या गेल्या त्यांची किंमत २४०० रूपये इतकी होती. ती मात्र आम्हा लाभार्थी महिलांना ७ हजारला दिली गेली. मशिन देताना महिला बालकल्याण विकास विभागाकडून दबाव आणून पावत्या घेतल्याचे या महिलांचे म्हणणे आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वीच्या या शिलाई मशिन दुरूस्ती करण्याचा ठेका त्या ठेकेदाराचा असतो व त्यानंतर लाभार्थीची जबाबदारी असते.
दरम्यान, याबाबत उत्तर न दिल्याने वर्दे, कडावल येथील महिला निकिता सावंत, श्रेया सावंत, विनिता मुंज, मालती सुर्वे आदी महिलांनी उपोषण केले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या कमल परूळेकर यांनी भेट दिली व न्याय मिळावा, असे सांगितले. परंतु या आर्थिक वर्षात शिलाई मशिन खरेदीच झाली नसल्याचा निर्वाळा महिला बालकल्याणच्या एका बैठकीत वंदना किनळेकर यांनी केला आहे. (वार्ताहर)
‘त्या’ कर्मचाऱ्यांवर कारवाई करा
निकृष्ट दर्जाच्या या शिलाई मशिन त्या आर्थिक वर्षात खरेदी न केल्याचे महिला बालविकास समिती बैठकीत सांगण्यात आले होते. सध्या या मशिन या लाभार्थी महिलांना शोपीस लावल्यासारखे वाटत आहे. त्याचा काही उपयोग नाही. आम्ही भरलेली १० टक्के रक्कम व्याजासह परत मिळावी व तीन वर्षापूर्वी दबाव आणून पावती लिहून घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी ही मागणी बुधवारी जिल्हा परिषद भवनासमोर बसलेल्या शिलाई मशिनच्या महिलांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.