पोलिसांविरोधात उपोषण करणार
By Admin | Updated: December 1, 2014 00:16 IST2014-11-30T21:39:12+5:302014-12-01T00:16:38+5:30
तक्रार करुनही कारवाई नाही : मुंज कुटुंबीयांचा निवेदनातून इशारा

पोलिसांविरोधात उपोषण करणार
सावंतवाडी : सतीश राजाराम ठोंबरे (रा. सावंतवाडी) यांच्यावर महाराष्ट्र नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८३ नुसार कारवाई करण्याबाबत दुय्यम निबंधक श्रेणी १ सावंतवाडी यांनी सावंताडी पोलीस ठाण्यात ३० मे २०१४ रोजी एफआयआर क्र. ३००९ वर्ष २०१४ अन्वये दाखल करूनही सावंतवाडी पोलीस याबाबत कोणतीही कारवाई करत नसल्याने येथील साईनाथ राजाराम मुंज ९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून कुटुंबीयांसमवेत उपोषणास बसणार आहेत.
२९ एप्रिल २०१३ रोजी नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय) महाराष्ट्र, पुणे यांच्या कार्यालयाकडे रद्द केलेल्या कुलमुखत्यार पत्राद्वारे बेकायदा खरेदी क्र. २१६४/१२ संगनमत करून रजिस्टर केल्याप्रकरणी हे खरेदीखत करून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी साईनाथ मुंज यांनी तक्रार अर्ज दाखल केला होता.
नोंदणी उपमहानिरीक्षक मुख्यालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयाकडील १ जुलै २०१३ च्या पत्राने प्रस्तुत प्रकरणी नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८२ अन्वये गुन्हा ठरणारे कृत्य घडले असल्याचे प्राथमिक चौकशीत दिसून आले.
त्यानुसार फौजदारी प्रक्रिया करण्यास कलम ८३ अन्वये सतीश राजाराम ठोंबरे, सावंतवाडी यांच्यावर सक्षम न्यायालयात अभियोग दाखल करण्यास दुय्यम निबंधक श्रेणी १ सावंतवाडी यांना ७ एप्रिल २०१४ जा. क्र. सर्जिनिसि/तक्रार/१२८१-८२/२०१४ अन्वये जिल्हा निबंधक तथा अप्पर जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी दिलेल्या परवानगीप्रमाणे दुय्यम निबंधक श्रेणी १ सावंतवाडी यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यामध्ये ३० मे रोजी एफआयआर क्र. ३००९ वर्ष २०१४ अन्वये दाखल करूनही सावंतवाडी पोलीस संबंधिताविरुद्ध सक्षम न्यायालयात अभियोग दाखल करण्यास जाणूनबुजून या व्यक्तींशी संगनमत करून टाळाटाळ करीत आहेत.
याबाबत वारंवार विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. तसेच जास्त चौकशी केल्यास केस फिरवून टाकू, अशी धमकीही दिली जात आहे.
याविरोधात ९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून कुटुंबासमवेत उपोषणास बसणार असल्याचे सावंतवाडी येथील मुंज कुटुंबियांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. (वार्ताहर)