शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी मिळावी
By Admin | Updated: March 9, 2015 23:44 IST2015-03-09T23:10:42+5:302015-03-09T23:44:48+5:30
आंबा, काजू बागायतदारांच्या संयुक्त बैठकीत निर्णय

शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी मिळावी
वेंगुर्ले : अवकाळी पाऊस, लांबलेली थंडी यामुळे आंबा रिफ्लॉवरींग व फळगळ यामुळे आंबा व काजू यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सहकारी संस्था, वित्तीय संस्था व राष्ट्रीय बँकांकडून शेतकरी आंबा, काजू बागायतदारांना शंभर टक्के कर्जमाफी मिळावी. त्याचबरोबर शासनाकडून प्रति झाडाप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, असा एकमुखी ठराव मांडण्यात आला. आंबा व काजू बागायतदार शास्त्रज्ञ मंच यांची संयुक्त बैठक आंबा केंद्रात आंबा, काजू मंचचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली. यावेळी आंबा मंचचे अध्यक्ष दीपक कुबल, सचिव विलास ठाकूर, फळ संशोधन केंद्राचे सहयोगी डॉ. बी. आर. साळवी, वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. पूजा पाटील, किटक शास्त्रज्ञ ए. वाय. मुंज, प्रा. आर. एम. देशपांडे, सदाशिव आळवे, शिवराम आरोलकर, शंकर नाबर, किशोर तुळसकर, सुरेश धुरी, सखाराम ठाकूर, विष्णू राऊळ, अशोक परब, चंद्रकांत कावडे, चंद्रकांत गडेकर, हनुमंत आंगचेकर, संतोष शेटकर, संतोष राऊळ, काशिनाथ आंगचेकर, देवेंद्र आंगचेकर, अरुण घोगळे, अनिल मोर्ये, राजन गावडे, जगदीश चमणकर, अनंत मोर्ये, सच्चिदानंद आंगचेकर, भालचंद्र परब, प्रवीण सातार्डेकर, यशवंत मठकर, विलास चव्हाण आदी बागायतदार उपस्थित होते.
प्रथम सचिव विलास ठाकूर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कार्यवाही केली.
यावेळी वेंगुर्ले तालुका आंबा व काजू उत्पादक सहकारी संघ निर्माण करण्याचे निश्चित करण्यात आले. सध्या अवकाळी पावसामुळे फळमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने रक्षक सापळे फळ केंद्राकडून शेतकऱ्यांना द्यावेत. परंतु त्याकरिता जिल्हा परिषद कृषी विभाग, आत्मा व कृषी विभाग यांच्याकडून रक्षक सापळ्यांकरिता ५० टक्के अनुदान उपलब्ध करून द्यावे.
आंबा फवारणीकरिता पॉवर स्प्रेअरयाकरिता सबसीडी कोट्यातून शासनाने बागायतदारांना परमिट देऊन सबसीडीचे जादा रॉकेल पुरवावे, याकरिता पुरवठा विभाग व तहसीलदार यांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले.
कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी आंबा कॅनिंगकरिता ५० रुपये किलो हमीभाव निश्चित करावा, शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई करारावर आंबे घेणाऱ्यांना मिळावी. (वार्ताहर)