कडवईत श्रेयवादावरून फलकबाजी
By Admin | Updated: March 29, 2016 00:23 IST2016-03-28T23:31:54+5:302016-03-29T00:23:35+5:30
संगमेश्वर तालुका : रेल्वे स्थानकाच्या मंजुरीवरून जुगलबंदी; प्रस्ताव केंद्राकडे रवाना

कडवईत श्रेयवादावरून फलकबाजी
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे रेल्वे स्थानकाच्या मंजुरीवरून आता श्रेयवाद सुरू झाला आहे. या श्रेयवादातूनच याठिकाणी लावण्यात आलेला फलक चर्चेचा विषय बनला आहे. कोकण रेल्वे कडवई रेल्वेस्थानक संघर्ष समितीने लावलेल्या या फलकामुळे संघर्ष समिती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा वाद रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दरम्यान, या रेल्वेस्थानकाच्या बांधकामाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आल्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी दिले आहे. या स्थानकासाठी मनसेनेच प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.
रेल्वेस्थानकाच्या मागणीसाठी २००८ सालापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी अनेक आंदोलने छेडली. कडवई स्थानक बांधकामाचा प्रस्तावही केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, हे होत असताना श्रेयाची लढाई मात्र तीव्र होताना दिसत आहे. कडवई स्थानकासाठी येथील ग्रामस्थ आंदोलनाच्या माध्यमातून सतत प्रयत्नशील आहेत. वर्षभरापूर्वी याच आंदोलनातून स्थानकाला मंजुरीही मिळाली आहे. मात्र, निधी उपलब्ध होत नसल्याने प्रत्यक्ष बांधकामाला विलंब होत आहे. यासाठी नुकताच १५ जानेवारी रोजी ग्रामस्थांच्यावतीने रेलरोकोचा प्रयत्नही करण्यात आला. यावेळी रेल्वे प्रशासनाच्यावतीने सहाय्यक प्रबंधक टी. मंजुनाथ व संगमेश्वरचे पोलीस निरीक्षक मनोहर चिखले यांनी ग्रामस्थांसोबत सकारात्मक चर्चा केली.
यावेळी करण्यात आलेल्या रेलरोको आंदोलनात मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, सदानंद ब्रीद, राजवाडी सरपंच नंदकुमार मांजरेकर यांच्यासह सर्वपक्षीय ग्रामस्थ सहभागी झाले होेते. रेल्वेस्थानक निर्मितीचा प्रस्ताव मंजुरीसाठी ८ आॅक्टोबर २०१५ला पाठवण्यात आला असून, कडवईसह कोकण रेल्वे मार्गावरील १० रेल्वेस्थानके व ८ लुपलाईनच्या बांधकाम मंजुरीसाठी राष्ट्रपतीकडे प्रस्ताव सादर केला असल्याचे लेखी पत्र रेल्वे प्र्रशासनाने दिले आहे.
मात्र, काम अंतिम टप्प्यात असताना अनिल घोसाळकर नामक व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली एक संघर्ष समिती स्थापन झाली असून, कडवई स्थानकाच्या मागणीसाठी ही समिती प्रयत्न करणार असल्याचे फलक चार दिवसांपूर्वी कडवई परिसरात अनधिकृतरित्या लावण्यात आले आहेत. त्यावर मनसेने आक्षेप घेतल्याने प्रत्यक्ष आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जे लोक गेल्या ८ वर्षात झालेल्या एकाही आंदोलनात सहभागी नव्हते आणि त्यांनी अचानक असे फलक झळकावले असल्याने ग्रामस्थांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. हा फक्त श्रेय लाटण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. (वार्ताहर)
श्रेय लाटण्यासाठी अनिल घोसाळकर यांनी केलेला हा केविलवाणा प्रयत्न असून, आपण घोसाळकर यांना जाहीर आवाहन करतो की, त्यांनी आंदोलनाची बाब तर दूरच पण पाठपुरावा केलेली दोन पत्र तरी दाखवावीत आणि नंतरच श्रेयासाठी धडपडावे. आपण ग्रामस्थांच्या साथीने गेली ८ वर्षे अविरत लढा देत असून, कडवई स्थानकाचे काम आता अंतिम टप्यात असताना आयत्या बिळावर नागोबा बनण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना जास्त महत्व देणार नाही.
- जितेंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष, मनसे
ही समिती २००८ साली स्थापन झाली आहे. मात्र, तेव्हापासून पाठपुरावा केलेल्या कागदपत्रांबाबत व आंदोलनाबाबत विचारणा केली असता ती उपलब्ध होऊ शकली नाही. आपण कडवई स्थानकाची मागणी करणार आहे.
- अनिल घोसाळकर, समिती अध्यक्ष