माहिती मिळविण्यात अपयश
By Admin | Updated: July 28, 2015 00:29 IST2015-07-27T22:54:21+5:302015-07-28T00:29:07+5:30
संशयास्पद जहाज : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर खळबळ

माहिती मिळविण्यात अपयश
मालवण : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर संशयास्पद स्थितीत महाकाय जहाज पुन्हा एकदा दिसून आल्याने सुरक्षा यंत्रणा हादरली आहे. मालवण रॉक गार्डन किनारपट्टीवर खोल समुद्रात जहाज रविवारी सायंकाळपासून स्थिरावले आहे. पावसाळी हंगामात समुद्रातील नौका प्रवास बंद असल्याने पोलिस प्रशासनास या जहाजापर्र्यत पोहचण्यास अडचणी निर्माण होत आहेत.
कोस्ट गार्डलाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. मात्र जहाजाची माहिती मिळवण्यात त्यानाही अपयश आले आहे. गरज पडल्यास हेलीकॉप्टरच्या मदतीने जहाजापर्यंत पोहचले जाईल अशी माहिती रत्नागिरी कोस्ट गार्ड कडून सायंकाळी उशिरा देण्यात आली. मालवण किनारपट्टीवर रविवारी सायंकाळी खोल समुद्रात महाकाय जहाज दिसून आले. याबाबत पोलिस प्रशासनाने सर्व पोलिस यंत्रणांना माहिती दिली असली तरी २४ तास उलटूनही जहाजाबाबत अधिकृत माहिती कळू शकली नाही. १५ दिवसापूर्वी अशाच पद्धतीने दोन जहाजे सिंधुदुर्ग किनारपट्टीवर दिसल्याने सुरक्षा यंत्रणात खळबळ उडाली होती. अखेर ती जहाजे मत्स्य सर्वेक्षणाची असल्याचे स्पष्ट झाले होते. (वार्ताहर)
सुरक्षा यंत्रणेने गांभीर्याने घेणे गरजेचे
आता पुन्हा एकदा किनारपट्टीवर जहाज दिसल्याने खळबळ उडाली आहे. २४ तास उलटले तरी कोस्ट गार्डही या जहाजा पर्यंत पोहचण्यात अपयशी ठरले आहे. सिंधुदुर्ग किनारपट्टीवर वारंवार अशा पद्धतीने जहाजे दिसतात. त्याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध होत नाही. यामुळे सुरक्षा यंत्रणा तेवढी सतर्क नसल्याचे बोलले जात आहे. सुरक्षा यंत्रणांनी गांभीर्याने पाहणे आवश्यक असल्याचे मत मच्छिमार व नागरिकांतून व्यक्त होत आहे.