दर्जेदार शिक्षणासाठी सुविधा हव्या

By Admin | Updated: September 5, 2014 23:26 IST2014-09-05T22:05:35+5:302014-09-05T23:26:15+5:30

नीतेश राणे : पाट हायस्कूलमध्ये धनादेशाचे वितरण

Facilities for quality education | दर्जेदार शिक्षणासाठी सुविधा हव्या

दर्जेदार शिक्षणासाठी सुविधा हव्या

कुडाळ : जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात प्रगती होणे गरजेचे आहे आणि यासाठी दर्जेदार शिक्षणाच्या सोयीसुविधा सहज उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रांतिक सदस्य नीतेश राणे यांनी पाट येथील एस. एल. देसाई शिक्षण संस्थेत आयोजित कार्यक्रमात केले.
तालुक्यातील पाट येथे एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्यावतीने माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा चालविली जात आहे. या शाळेमध्ये मुलांचा वाढता ओघ आणि त्यामानाने कमी पडणारी वर्गखोल्यांची संख्या यामुळे संस्थेने वर्गखोल्यांसाठी नवीन इमारत बांधण्याचे काम हाती घेतले आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी राज्याचे उद्योगमंत्री पालकमंत्री नारायण राणे यांनी आपल्या कुटुंबियांच्यावतीने पंचवीस लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. याचा धनादेश प्रदान कार्यक्रम पाट हायस्कूल येथे आयोजित केला होता.
या कार्यक्रमास स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष व काँग्रेसचे युवा नेते नीतेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद सदस्य रणजीत देसाई, संस्थाध्यक्ष रामचंद्र रेडकर, विकास कुडाळकर, पाट सरपंच कीर्ती ठाकूर, आनंद शिरवलकर, प्रकाश मोर्ये, सुनील भोगटे, संजय पडते, संजय वेंगुर्लेकर, रुपेश पावसकर, संस्थेचे कार्यवाहक डी. ए. सामंत आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य रणजीत देसाई म्हणाले, पाट विद्यालयाशी राणे यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. राणे यांचा आदर्श घेत सर्वांनीच या विद्यालयाच्या विकासासाठी पुढे यावे, असे आवाहन देसाई यांनी केले. सतीश सावंत म्हणाले, रस्ते, पाणी, आरोग्य याचबरोबर शैक्षणिक समस्याही दूर होण्यासाठी जिल्ह्यात प्रयत्न सुरु आहेत. कोणत्याही विकासात राजकारण आणण्यात आलेले नाही. यावेळी राणे व कुटुंबियांच्यावतीने धनादेश संस्थाध्यक्ष रामचंद्र रेडकर यांच्याकडे सुपूर्द केला. या कार्यक्रमादरम्यान शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सुधीर ठाकूर, तर आभार डी. ए. सामंत यांनी मानले. (प्रतिनिधी)

मदत करणार
यावेळी नीतेश राणे म्हणाले, देणारा कोण आहे, हे पहा. कोणालाही मदत करताना आम्ही राजकारण आणीत नाही. शिक्षणाचा दर्जा वाढण्यासाठी आम्ही मदत करीतच राहणार आहोत. या मदतीची जाणीव ठेवणे आवश्यक आहे, असे मत यावेळी नीतेश राणेंनी व्यक्त केले. विरोधकांप्रमाणे आम्ही आश्वासनांची नुसती पत्रे देत नाहीत, तर प्रत्यक्ष मदत करतो. परंतु जिल्ह्यात बाहेरुन आलेले काही लोक मात्र केवळ मदतीची पत्रे देतात. कोणतीही कृती करीत नाहीत, अशी टीका यावेळी नीतेश राणे यांनी केली.

Web Title: Facilities for quality education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.