चिपळूण नदीकिनारी पर्यटकांसाठी सुविधा

By Admin | Updated: January 7, 2015 23:58 IST2015-01-07T22:18:22+5:302015-01-07T23:58:54+5:30

गोवळकोट गजबजणार : नगरपालिका म्हणतेय, एक पाऊल पुढे...

Facilities for Chiplun riverfront tourists | चिपळूण नदीकिनारी पर्यटकांसाठी सुविधा

चिपळूण नदीकिनारी पर्यटकांसाठी सुविधा

चिपळूण : शहरातील निसर्गरम्य अशा गोवळकोट भागातून वाशिष्ठी नदी वाहत आहे. या नदीचे विहंगम दर्शन पर्यटकांना होण्यासाठी चिपळूण नगर परिषद प्रशासनातर्फे उपाहारगृह व बैठक व्यवस्था करण्यात आली असून, हे ठिकाण पर्यटकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. गोवळकोट परिसरातून वाशिष्ठी नदी वाहत असून, निसर्गरम्य असे हे ठिकाण आहे. पूर्वीच्या काळी मालाची ने-आण होडीतून केली जात असे. मात्र, सध्या ही वाहतूक बंद झाली आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मिती केल्यानंतर पाणी या नदीत सोडले जाते. या नदीच्या पाण्यावरच चिपळूण शहराची तहान भागवली जात आहे. गोवळकोट जेटी येथे पर्यटकांसाठी केंद्र शासनाच्या पर्यटन विकास योजनेअंतर्गत उपाहारगृह व बैठक व्यवस्था करण्याबाबतच्या प्रस्तावाला नगर परिषद प्रशासनातर्फे मंजुरी मिळाल्यानंतर या ठिकाणी पर्यटकांच्या सोयीसाठी उपाहारगृह व बैठक व्यवस्थेचे काम सुरु करण्यात आले. हा परिसर निसर्गरम्य असल्याने जास्तीत जास्त पर्यटक या ठिकाणी येऊन या निसर्गरम्य ठिकाणाचा आनंद घेऊ शकतात. ४० लाख ५३ हजार ५३८ रुपये खर्च करुन ही सुविधा येथे होणार आहे. उपाहारगृह व बैठक व्यवस्थेचे काम पूर्ण झाले असून, संबंधित ठेकेदाराने काम पूर्ण झाल्याचा दाखला नगर परिषद प्रशासनाकडे सादर केला आहे. या ठिकाणी बैठक व्यवस्थेबरोबरच विद्युत व्यवस्थाही करण्यात आली आहे.
चिपळूण शहरात पर्यटकांना आकर्षित करण्यासारखे एकही ठिकाण नसल्याने पर्यटक अन्य ठिकाणी जाणे पसंत करतात. डिसेंबर महिन्यामध्ये गोवळकोट या परिसरात बॅकवॉटर क्रोकोडाईल सफर हा उपक्रम राबविण्यात आला. याला पर्यटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गोवळकोट येथे पर्यटकांसाठी उभारण्यात आलेले उपाहारगृह व बैठक व्यवस्था तातडीने सुरु होण्याच्या दृष्टीने नगर परिषद प्रशासनाने योग्य उपाययोजना केल्यास हे ठिकाण पर्यटकांसाठी एक आकर्षण ठरणार आहे. चिपळूणला गोवळकोट, कालुस्तेचा परिसर पर्यटकाना सातत्याने भुरळ घालत असतात. या परिसरात पालिकेची विविध योजनांतर्गत अनेक विकासकामे सुरू असून, गोवळकोट परिसराला पर्यटनाचा नवी झळाळी दिली जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Facilities for Chiplun riverfront tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.