अतिउत्साह ठरतोय जीवघेणा
By Admin | Updated: July 21, 2015 00:55 IST2015-07-21T00:52:18+5:302015-07-21T00:55:25+5:30
मद्यपी पर्यटकांना आळा घाला : शासनाने सुरक्षेच्यादृष्टीने गांभिर्याने घेणे गरजेचे

अतिउत्साह ठरतोय जीवघेणा
सिद्धेश आचरेकर ल्ल मालवण
सागरी पर्यटनाचा विचार करता तारकर्ली व देवबाग जगाच्या कानावर कानाकोपऱ्यात पोहोचले. येथील स्वच्छ व मनमोहक समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालतात. मात्र अलिकडील काळात अतिउत्साही पर्यटकांचा उत्साह त्यांच्या जीवावर बेततो आहे. गेल्या काही वर्षात पर्यटकांचे हॉटस्पॉट असलेल्या या समुद्रकिनाऱ्यांवर बुडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. दरवर्षी लाखो देशी विदेशी पर्यटक येथील पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटतात. मात्र पर्यटकांच्या सुरक्षेच्या बाबतीत शासनाचे अक्षम्य दुर्लक्षच दिसून येते.
तारकर्ली-देवबाग किनारी समुद्रात आजतागायत अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. अशा घटना घडल्यास प्रत्येकवेळी जीवरक्षकांच्या नियुक्तीचा प्रश्न उपस्थित केला जातो. मात्र यावर शासनस्तरावरून कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. पर्यटकांच्या मृत्यूस त्यांचा अतिउत्साहीपणा कारणीभूत असला तरी शासनाने पर्यटन हे विकासाचे माध्यम म्हणून पाहताना पर्यटकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना आखणे आवश्यक आहे.
पावसाळी हंगामात समुद्रात मासेमारी व पर्यटन व्यवसाय करण्याची शासनाकडून १ जून ते ३१ जुलै असा बंदी कालावधीचे निर्देश आहेत. असे असताना शासनाचे नियम धाब्यावर बसवून मच्छिमार किवा अतिउत्साही पर्यटक जीव धोक्यात घालून समुद्रात उतरतात.
अतिउत्साही पर्यटकांमध्ये सूचनांचे पालन न करता आपल्या मर्जीनुसार काहीजण समुद्रात उतरून मौजमस्ती करतात. पावसाळी हंगामात समुद्री लाटा उसळत्या आणि वेगात असतात. लाटांच्या तडाख्यात सापडल्यास मृत्यूचे दर ठोठावे लागते. याची प्रचिती गेली कित्येक वर्षे येत आहे.
पर्यटक हे एक किंवा दोन दिवसांच्या टूरवर आलेले असतात. मालवण, तारकर्लीसारख्या नयनरम्य ठिकाणी वर्षा सहली आयोजित केलेल्या असतात. स्वच्छ किनाऱ्यांची सर्वांनाच भुरळ पडते. जिल्ह्याबाहेरील पर्यटकांना समुद्राचे मोठे आकर्षण असते. केव्हा एकदा पाण्यात उतरतो याची उत्सुकता असते. तारकर्ली समुद्र किनारा ‘डेंजर झोन’ आहे. पर्यटक समुद्रस्नानाचा आनंद घेता घेता समुद्रात हळूहळू आत जाऊ लागतात. याची त्यांना कल्पनाही येत नाही. आणि दुर्दैवाने एखाद्या भयंकर लाटांचा तडाखा सोसावा लागतो अन प्राणही गमवावे लागतात.