मुख्य सेविकांकडे कामाचा अतिरिक्त ताण
By Admin | Updated: March 3, 2015 00:35 IST2015-03-02T21:50:20+5:302015-03-03T00:35:20+5:30
कदम : कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची सभा

मुख्य सेविकांकडे कामाचा अतिरिक्त ताण
कणकवली : मुख्य सेविकांना त्यांच्या जॉबचार्ट व्यतिरिक्त कामे त्यांच्यावर लादल्याने कामाचा प्रचंड भार निर्माण झाला आहे. सांख्यिकी विस्तार अधिकारी पदे व्यपगत झाल्याने हा कार्यभार मुख्य सेविकांना दिलेला आहे. अंगणवाडी केंद्रांना भेटी देणे व त्यांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट साध्य करता येत नाही. त्यामुळे एकात्मिक बालविकास सेवा योजनेची उद्दिष्ट्ये व हेतू साध्य करणे मुख्य सेविकांना शक्य होताना दिसत नाही, असे प्रतिपादन कास्ट्राईब कल्याण कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम यांनी केले.कास्ट्राईब जिल्हा परिषद मुख्य सेविका कर्मचारी कल्याण महासंघाची सभा जिल्हाध्यक्षा संचिता कुडाळकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी कुडाळ पंचायत समिती येथे सावित्रीबाई फुले सभागृहात झाली. यावेळी संदीप कदम बोलत होते. जिल्हा पदाधिकारी एम. आर. सुतार, एम. जी. मेडवे, व्ही. व्ही. कोतगी, के. पी. वाढोकर, सी. ए. घाडीगावकर, शर्मिला सावंत, वळवी, एस. आर. नाईक, वायकुंटे, ए. बी. धुपकर, कविता गवाणकर, स्नेहा सामंत, आदी उपस्थित होते.
कदम म्हणाले, नियमितपणे सांख्यिकी विस्तार अधिकारी पदाचे काम करण्यासाठी कार्यालयात उपस्थित राहावे लागत आहे. तसेच मुख्य सेविकांना कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत जॉबचार्टमध्ये नसलेली जोखमीची बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेतील कामे करावी लागत आहेत.
यावेळी जिल्हाध्यक्षा संचिता कुडाळकर, एस. के. गायकवाड, एस. एस. पवार, प्राजक्ता तुळसकर, एल. एस. कासले यांनी मार्गदर्शन केले. आभार जी. ए. पाटकर यांनी मानले. (प्रतिनिधी)
अन्यथा बेमुदत
साखळी उपोषण
मुख्यसेविकांना वेतनश्रेणी देण्यासही विलंब होत आहे. दोडामार्ग मुख्यसेविका आराधना धुपकर यांची सेवा जोडून देण्यास सहविचार सभेला मान्यता दिली असतानाही विलंब होत आहे.
अशा अनेक महत्त्वपूर्ण समस्यांबाबत महिला व बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे यांच्यासोबत चर्चा करून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करूया, अन्यथा बेमुदत साखळी उपोषणास बसुया, असे कदम यांनी सांगितले.