समाजाच्या परिवर्तनाचा वेध
By Admin | Updated: October 10, 2014 23:00 IST2014-10-10T21:26:06+5:302014-10-10T23:00:53+5:30
नीतेश राणे : कणकवलीत ‘व्हिजन २0२४’ डॉक्युमेंटरीचे प्रदर्शन

समाजाच्या परिवर्तनाचा वेध
कणकवली : निवडणूक ही फक्त आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी नसते तर समाज परिवर्तन घडविण्यासाठी असते. त्यामुळे आगामी काळात कणकवली शहराबरोबरच तालुक्यातील सर्व समाजाचा विकास करून कशाप्रकारे परिवर्तन घडविता येईल याचा वेध ‘मिशन कणकवली २०२४’ च्या माध्यमातून घेतलेला आहे, असे काँग्रेसचे उमेदवार नीतेश राणे यांनी स्पष्ट केले.
कणकवली तालुक्याच्या ‘व्हिजन २०२४’ या डॉक्युमेंटरीचे प्रदर्शन हॉटेल नीलम कंट्रीसाईडच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी नीतेश राणे बोलत होते. यावेळी कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
नीतेश राणे म्हणाले, ‘मिशन २०२४’ च्या माध्यमातून कणकवली तालुक्याचा विकास कशाप्रकारे करता येईल याबाबत वेध घेण्यात आला. तालुक्यातील मान्यवरांनी विकासासंदर्भात आणखीन काही मुद्दे सुचविल्यास त्याच्यावरही निश्चितपणे विचार करता येईल. या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्याचा आपला प्रयत्न असून हा संवाद असाच कायम ठेवून विकासाचा आधारस्तंभ बनवूया. विकासासाठी मेहनत करण्याची माझी तयारी आहे. मात्र, तुमचे सहकार्यही अपेक्षित आहे. आपण ज्या उमेदवाराला आमदार म्हणून निवडून देणार आहोत तो आपल्या जीवनात पुढील पाच वर्षात काय परिवर्तन घडविणार आहे हे जाणून घेण्याचा अधिकार मतदारांना आहे. आपल्या आमदाराकडे दूरदृष्टीपणा आहे का? याचा विचारही मतदारांनी करणे आवश्यक आहे. तसा विचार मतदारांनी केला तरच चांगला उमेदवार निवडून देता येईल. ज्या विश्वासाने मतदार उमेदवाराला निवडून देतील तो विश्वास सार्थ ठरविला जाणार आहे की नाही हे मतदारांना समजावे यासाठीच ही डॉक्युमेंटरी निर्माण करण्यात आली आहे. कणकवलीचे दरडोई उत्पन्न नाशिकपेक्षा जास्त आहे. तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत विकास प्रक्रिया नेण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी आमदारनिधीच हवा अशी आवश्यकता नाही. सत्ता नाही म्हणून विकासकामे झाली नाहीत असे म्हणणाऱ्यांपैकी मी नाही. त्यामुळे कणकवली तालुक्यात चांगल्या आरोग्य सुविधा, रोजगार, पर्यटनदृष्ट्या विकास, व्यापाराचे आधुनिकीकरण अशा महत्वाच्या गोष्टींनाही प्राधान्य देण्याचा आपला प्रयत्न राहणार असून फक्त आपले आशीर्वाद आवश्यक असल्याचे राणे यांनी यावेळी सांगितले.
संदेश पारकर यांनीही मनोगत व्यक्त केले. तर डॉ. संदीप नाटेकर, अशोक करंबेळकर, अॅड. उमेश सावंत, डॉ. नितीन शेट्ये, डॉ. शमिता बिरमोळे, मधुसूदन नानिवडेकर यांनीही तालुक्याच्या विकासासंदर्भात विविध संकल्पना मांडल्या.
यावेळी १२ मिनिटांची ‘व्हिजन कणकवली २०२४’ ही चित्रफित दाखविण्यात आली. (वार्ताहर)
अशी आहे डॉक्युमेंटरी
उद्योगधंदे व रोजगार निर्मिती.
महिला भवनाची गावागावात उपकेंद्रे.
वागदे येथे कौशल्य भवन.
गारमेंटमधून रोजगार.
सुसज्ज स्टेडियम.
कणकवली येथे गारमेंट महाविद्यालय.
कोकण मेवा प्रक्रिया उद्योग.
सिलिकावर प्रोसेसिंग व फायनल प्रॉडक्शन.
चिऱ्यांचे मार्केटींग.
बाजारपेठांचा सुनियोजित विकास.
शैक्षणिक विकास.
युवा व स्त्री शक्ती सबलीकरण.