३९७ लाखांचा निधी खर्ची
By Admin | Updated: August 8, 2014 00:42 IST2014-08-07T21:31:01+5:302014-08-08T00:42:49+5:30
डोंगरी विकास कार्यक्रम : पाच तालुके, एक उपगटाचा समावेश

३९७ लाखांचा निधी खर्ची
रत्नागिरी : डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत पाच तालुक्यांना व एका उपगटाला जिल्हा नियोजन विभागाकडून दिलेल्या एकूण ४ कोटी ४० लाखपैकी ३ कोटी ९७ लाख रूपये खर्च करण्यात आले. संगमेश्वर तालुक्यात तसेच मंडणगड उपगटात आतापर्यंत प्राप्त निधी पूर्णपणे खर्च करण्यात आला आहे. बाकीच्या चार तालुक्यांत निधी अजूनही अखर्चित आहे. राजापूर तालुक्यात तर केवळ ५० लाख इतका निधी मार्चअखेर खर्च झाला आहे.रत्नागिरी जिल्ह्यात खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर या पाच तालुक्यांचा पूर्ण गट आणि मंडणगड तालुक्याचा उपगट तालुक्यात समावेश होतो. डोगरी विकास कार्यक्रमांतर्गत प्रत्येक तालुक्याला १ कोटी आणि उपगटाला ५० लाख याप्रमाणे ५ कोटी ५० लाख इतकी तरतूद आहे.यात तालुक्यांमधील अन्य विकासकामांचा समावेश आहे. सन २०१३ - १४ साठी जिल्हा नियोजन मंडळाकडून या पाच तालुक्यांना प्रत्येकी ८० लाख आणि मंडणगड उपगटासाठी ४० लाख अशा एकूण ४ कोटी ४० लाख निधीची तरतूद करण्यात आली होती. हा सर्व निधी कार्यान्वयन यंत्रणेकडे वितरीत करण्यात आला होता. त्यापैकी मंडणगड आणि संगमेश्वर या तालुक्यांमध्येच हा निधी पूर्णपणे खर्च झाला आहे. उर्वरित खेड, चिपळूण, लांजा आणि राजापूर यांचा अखर्चित निधी अद्याप कार्यान्वयन यंत्रणांकडे शिल्लक आहे.चार तालुक्यात अद्यापही निधी अखर्चित असून राजापूर तालुक्यात तर केवळ ५० लाख इतकाच निधी मार्चअखेर खर्ची पडला आहे. हा निधी कधी खर्ची पडणार? असा सवाल केला जात आहे.
या सहाही तालुक्यांना या निधीमुळे नवीन कामांसाठी दीड पट वाव असून, ४ कोटी २६ लाख २५ हजार इतक्या निधीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे नव्या वर्षात या विकासकामांवर उरलेला निधी खर्च करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)