आयसीटीतून विनाअनुदानित शिक्षकांना वगळले
By Admin | Updated: January 25, 2015 00:49 IST2015-01-25T00:49:12+5:302015-01-25T00:49:12+5:30
शाळांमधून नाराजीचा सूर : मार्चमध्ये होणाऱ्या प्रशिक्षणासाठी समाविष्ट करण्याची मागणी

आयसीटीतून विनाअनुदानित शिक्षकांना वगळले
शिवापूर : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, ओरोस व माध्यमिक शिक्षण विभाग, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने नववी व दहावीला शिकविणाऱ्या शिक्षकांना देण्यात येणाऱ्या आयसीटी प्रशिक्षणातून विनाअनुदानित शिक्षकांना वगळण्यात आल्याने शिक्षण विभाग व शिक्षण, प्रशिक्षण संस्थेबाबत विनाअनुदानित शाळांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
२० जानेवारी २०१५ ते २४ जानेवारी २०१५ तसेच २७ मार्च २०१५ ते ३१ मार्च २०१५ अशा पाच दिवसांच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील नववी व दहावी विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या व ब्रिटिश कौन्सिलचे प्रशिक्षण केलेल्या शिक्षकांना सोडून उर्वरित शिक्षकांना सध्या सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक व प्रशिक्षण संस्था व माध्यमिक शिक्षण विभाग सिंधुदुर्गच्या संयुक्त विद्यमाने आयसीटीचे प्रशिक्षण देण्याचे काम जिल्ह्यात सुरू आहे.
सध्या दहावीची २०१४-१५ ची पूर्व परीक्षा सुरू असल्याने प्रशिक्षणाला तसा अल्प प्रतिसाद मिळत आहे. परंतु, उपस्थित शिक्षकांना योग्य प्रकारे प्रशिक्षण सुरू आहे. शिक्षकांमधून योग्य प्रकारे प्रशिक्षण सुरू असून, शिक्षकांमधून समाधान व्यक्त होत आहे. परंतु विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना या प्रशिक्षणामध्ये सामावून न घेतल्याने त्यांच्यात या भेदभावाबाबत नाराजी पसरली आहे.
विनाअनुदानित शाळांमध्ये नववी, दहावीचे वर्ग आहेत व त्यांनासुध्दा आयसीटी विषय आहे. त्यामुळे शिक्षण विभाग व जिल्हा शिक्षण-प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्ग यांनी २७ मार्च २०१५ ते ३१ मार्च २०१५ या दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षक विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांना सामावून घ्यावे. तसे न केल्यास या शाळेतील विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. गुरुनाथ पेडणेकर यांनी विनाअनुदानित शिक्षकांच्या तसेच शाळांच्या समस्येकडे लक्ष देऊन दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या आयसीटी प्रशिक्षणात विनाअनुदानित शिक्षकांना सहभागी करून घ्यावे, अशी मागणी शिक्षकवर्गातून होत आहे. (वार्ताहर)