जिल्ह्यात सर्वत्र भातशेती तरारली...
By Admin | Updated: July 22, 2014 21:51 IST2014-07-22T21:51:11+5:302014-07-22T21:51:11+5:30
दुबार पेरणीचे संकट टळले : सतत पाऊस पडल्याने शेतकरी सुखावला

जिल्ह्यात सर्वत्र भातशेती तरारली...
चिपळूण : सध्या पाऊस स्थिरावला असल्याने लावणीची कामे वेगात सुरु आहेत. तसेच लावणी केलेली भाताची रोपे आता चांगलीच तरारली आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण आहे.
चालू मोसमात पाऊस कमालीचा लांबला. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर आले होते. काही ठिकाणी रोपे उगवली होती. ती सुकून जातात की काय? अशी भीती निर्माण झाली होती. शेतकरीवर्ग चिंतातूर झाला होता. पावसाकडे त्याचे डोळे लागले होते. परंतु, जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेला पाऊस समाधानकारक पडत असल्याने लावणीची कामे वेगात सुरु आहेत. यावर्षी पाऊस कमी पडत असला तरी सध्या गरजेइतका पाऊस पडत असल्याने शेतकरी सुखावला आहे. चालू मोसमात सरीवर सरी कोसळत आहेत. त्यामुळे नदी, नाले भरुन वाहात आहेत. वरकस ठिकाणीही पाणी झाल्याने डोंगराळ भागातही धरपाण्याच्या लावणीचे काम सुरू झाले आहे. आतापर्यंत ७० टक्क्यांपेक्षा जास्त लावणीचे काम पूर्ण झाले आहे. पावसाचे वेळापत्रक बिघडले असून, या मोसमात पाऊस फारसा पडण्याची अपेक्षा नाही. वातावरणाचा अंदाज घेऊन कामे पूर्ण करीत आणली आहेत. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत यंदा पिकावर परिणाम होणार आहे. (प्रतिनिधी)