संत तुकाराम वनग्राम योजनेतून साधणार पर्यावरण संतुलन

By Admin | Updated: February 27, 2015 23:18 IST2015-02-27T22:56:25+5:302015-02-27T23:18:14+5:30

कामकाजाबद्दल समाधान : शिवाजीनगर ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय समितीची भेट, आता शिवाजीनगर राज्याच्या शर्यतीत

Environmental balance that will be conducted through Sant Tukaram Vanagram scheme | संत तुकाराम वनग्राम योजनेतून साधणार पर्यावरण संतुलन

संत तुकाराम वनग्राम योजनेतून साधणार पर्यावरण संतुलन

शिवाजी गोरे-दापोली -शासनाने पर्यावरण समतोल व वनरक्षण करण्यासाठी संत तुकाराम वनग्राम योजना २००६ पासून राज्यात लागूकेली ११७९९ गावामध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समित्या स्थापन करुन या योजनेचे काम सुरू झाले. संत तुकाराम महाराजांच्या नावाने सुरु झालेल्या या योजनेचे सकारात्मक पडसाद पडायला लागले असून दापोली तालुक्यातील शिवाजीनगर ग्रामपंचायतीने संत तुकाराम वन ग्राम योजनेत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावला आहे. या गावाला काल राज्यस्तरीय मूल्यमापन समितीने भेट दिली असता, या योजनेचे सकारात्मक कामे दिसून आली आहेत. त्यामुळे राज्यस्तरीय पुरस्काराच्या शर्यतीत शिवाजीनगर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्य मूल्यमापन समितीचे अध्यक्ष एस. आर. बाबर, ए. जी. जमदाडे, विभागीय वनाधिकारी मूल्यांकन एस. जी. लडखत, उपसंचालक सामाजिक वनीकरण, तुकाराम साळुंखे मुख्य वनसंरक्षक कार्य आयोजन पुणे या कमिटीने शिवाजीनगर गावाला भेट दिली असून, शिवाजीनगर ग्रामपंचायतीने केलेल्या कामाची पाहणी केली. गावाने लोक सहभागामुळे श्रमदान केलेल्या कामाची पाहणी करण्यात आली. या पाहणीत शिवाजीनगरचे काम उत्कष्ट असल्याचे मूल्यमापन समितीच्या निदर्शनास आले असून जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर शिवाजीनगर ग्रामपंचायत आता राज्यस्तरीय बक्षीस घेण्यासाठी सज्ज झाली आहे.
शिवाजीनगर ग्रामपंचायतीच्या संयुक्त वनव्यवस्थापन समितीने वनीकरण, मृद व जलसंधारण, वनसंरक्षण, वनामध्ये अवैध चराई प्रतिबंध वन्य पशु पक्षी संरक्षण, वन्य प्राणी-पक्षी यांना पाणवठा, श्रमदान, लोकसहभाग, इंधनाचा वापर आदी अटी पूर्ण केल्या आहेत.
वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पत्की यांचे मार्गदर्शनाखाली संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे आनंदा हिरडीकर वनपाल अनिल दळवी, वनरक्षक, वन व्यवस्थापन अध्यक्ष संजय महाडिक, चंद्रकांत सावंत, अशोक पवार सरपंच, राजेंद्र भोळे, तंटामुक्त अध्यक्ष सुधीर माने, दीपक कुंबेरे, राजेंद्र पवार, चंद्रकांत राणे, रमेश पंदेरे यांनी काम केले.


‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे’ या अभंगाच्या माध्यमातून वने व वन्यजीव यांचे महत्त्व पटवून देणाऱ्या संत तुकाराम महाराज यांच्या नावाने संत तुकाराम वनग्राम योजना शासनाने सुरु केली असून, या योजनेंतर्गत ज्या संयुक्त वन व्यवस्थापन समित्या भाग घेतील त्यामधून जिल्हास्तरावरील उत्कृष्ट ठरणाऱ्या ३ समित्यांना अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरे बक्षीस दिले जाते. जिल्हास्तरावरील बक्षीसपात्र वनव्यवस्थापन समितीतून राज्यासाठी मूल्यमापन केले जाते. राज्यस्तरावरील ३ उत्कृष्ट संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांना संत तुकाराम वनग्राम उत्कृष्ट राज्यस्तरीय संयुक्त वनव्यवस्थापन समिती पारितोषिक प्रदान करण्यात येतो. प्रथम १० लाख, द्वितीय ५ लाख, तृतीय ३ लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाते.
बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले असून शिवाजीनगर गावाने गावातील विहिरीला बंदिस्त जाळी बसवून बिबट्याचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे.

Web Title: Environmental balance that will be conducted through Sant Tukaram Vanagram scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.