निराधारांना जगण्याचा आनंद

By Admin | Updated: July 16, 2014 23:15 IST2014-07-16T23:13:42+5:302014-07-16T23:15:57+5:30

शासनाच्या मदतीची गरज : संदीप परब यांचा आदर्शवत उपक्रम--लोकमत विशेष

Enjoy the life of the destitute | निराधारांना जगण्याचा आनंद

निराधारांना जगण्याचा आनंद

रजनीकांत कदम - कुडाळ
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निराधार, विकलांग, वृद्ध, महिला, मनोरुग्ण यांच्यासाठी अणाव येथील जीवन आधार संस्थेचे संदीप परब हे आधार बनलेले आहेत. अनेक निराधारांना आश्रय देऊन त्यांचा सर्वश्रुत विकास केला. अशा या समाजकार्य करणाऱ्या युवकाच्या पाठिशी शासनानेही खंबीरपणे राहणे गरजेचे आहे.
'जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा', या तुकारामांच्या उक्तीप्रमाणेच संदीप परब हे आपल्या कामाच्या माध्यमातून निराधारांसाठी देवदूतच बनले आहेत. कुडाळ तालुक्यातील अणाव गावातील संदीप परब हे निराधार, वृद्ध, मनोरुग्ण यांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्यांच्या अन्न, वस्त्र व निवारा या प्राथमिक गरजा पूर्ण होऊन त्यांचेही जीवन समृद्ध व्हावे, याकरिता गेली कित्येक वर्षे दिवसरात्र झटत आहेत.
निराधार वृद्धांसाठी आनंदाश्रमाची स्थापना केल्यानंतर काही वर्षातच येथील निराधार स्त्रीया, मनोरुग्ण मुले, विकलांग याच्या आश्रयासाठी काहीतरी करावे, असे त्यांना वाटत होते. मात्र, आनंदाश्रमाची जागा यासाठी अपुरी पडू लागल्याने जागा आणि इमारतीचा प्रश्न निर्माण झाला. परंतु त्यांच्या या समाजकार्याला हातभार म्हणून पणदूर येथील संजय सावंत यांनी स्वत:चा बंगला परब यांच्या आश्रमासाठी दिला आणि हा प्रश्नही मार्गी लागला. अशारितीने संदीप परब यांच्या प्रयत्नातून पणदूर येथे २०१३ साली सविताश्रम उभा राहिला. या सविताश्रमात सध्या निराधार महिला, विकलांग, मनोरुग्ण अशा एकूण २६ निराधार व्यक्तिंना आश्रय मिळाला आहे. त्यांच्या प्राथमिक गरजा आणि आरोग्यविषयक व्यवस्था परब यांच्या ‘जीवन आधार’ या संस्थेमार्फत केली जाते. येथील व्यवस्था बबन परब व दर्शना गवस यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. याठिकाणी चौदा व्यक्ती दिवसरात्र या निराधारांची सेवाभावी वृत्तीने सेवा करीत आहेत.
जिल्ह्यातील निराधार, वृद्धांना आधार मिळण्यासाठी दोन्ही आश्रमातील जागा कमी पडत असल्याने मोठी जागा आणि इमारतीची आवश्यकता आहे. निराधारांच्या या आश्रयस्थानांकडे शासनाने गांभीर्याने पाहून शासनाने आश्रमासाठी जागा उपलब्ध करून द्यावी.
तसेच सर्व प्रकारची मदत केल्यास जिल्ह्यात कोणीही निराधार राहणार नाही. या आश्रमांना मदत करण्यासाठी जीवन आनंद संस्थेच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन परब यांनी केले आहे. मुंबईतील फूटपाथवरील आजारी, जखमी, निराधार वृद्ध, मुले यांच्यासाठीही संदीप परब हे देवदूत ठरले आहेत. या निराधारांना आवश्यक त्या आरोग्य, अन्न, वस्त्र, निवारा या सोयी त्यांच्यामार्फत पुरविल्या जातात.

-संदीप यांनी लहानपणीच रस्त्याने चालत जाणाऱ्या एका वृद्ध स्त्रीला गटारात पडण्यापासून वाचविले.
-आपण या निराधार वृद्धांसाठी, मुले-स्त्रियांसाठी काहीतरी केले पाहिजे, असे त्यांनी ठरविले.
-हाच ध्यास घेऊ न त्यांनी पुढे कार्य करण्याचे ठरविले.
-शिक्षण पूर्ण करता करता मुंबई येथील मित्रांच्या सहाय्याने अनेक निराधार वृद्ध, स्त्रिया, लहान मुले यांची आश्रमात भरती करत त्यांना आधार मिळवून दिला.
-सिंधुदुर्गातील निराधारांसाठी काहीतरी करावे, अशी भावना त्यांच्या मनात आली.

-कसल्याही प्रकारचे आर्थिक सहाय्य नसताना त्यांनी हा ध्यास पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला.
-वृद्ध निराधारांसाठी अणाव येथे २००७ साली ‘आनंदाश्रम’ वृद्धाश्रमाची स्थापना केली.
-या वृद्धाश्रमामध्ये निराधार वृद्ध पुरुष, महिलांना आसरा दिला.
- अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागविल्या. त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली. हे कार्य त्यांनी आता अविरतपणे पुढे सुरू ठेवले आहे.
-या आश्रितांची सेवा करण्यासाठी बबन परब व त्यांचे सर्व सहकारी, परिचारिका सहकार्य करीत आहेत.

आर्थिक अडचणींचा करावा लागतो सामना
आनंदाश्रम चालविण्यासाठी संदीप परब यांना अनेक आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते. परंतु या समाजकार्याला येथील विविध क्षेत्रातील व्यक्ती सढळहस्ते मदत करत असल्याने हे कार्य सुरू आहे. ‘वाढदिवसाचा थोडासा खर्च निराधार वृध्दांना दिलात, तर त्यांना मदत होईल,’ असे आवाहन या संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
नागरिकांचेही सहकार्य
निराधारांसाठी दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या संदीप परब यांच्याबरोबरच त्यांचे काका बबन परब, गुजरातचे सरोजबीन शहा, मुंबई येथील श्रीनिवास सावंत, रामचंद्र अडसुळे, प्रसाद परब, संतोष पुजारे, नरेश चव्हाण, सुधीर जाधव यांच्यासह कुडाळातील डॉक्टर, व्यापारी, नागरिकांचेही सहाय्य मिळत आहे.

Web Title: Enjoy the life of the destitute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.