‘भल्ली भल्ली भावय’चा आनंद लुटला
By Admin | Updated: August 3, 2014 01:57 IST2014-08-03T00:54:48+5:302014-08-03T01:57:08+5:30
निमित्त नागपंचमीचे : कोळोशीवासीयांचा परंपरागत खेळ

‘भल्ली भल्ली भावय’चा आनंद लुटला
नांदगांव : कणकवली तालुक्यातील कोळोशी येथे नागपंचमीच्या दिवशी ‘भल्ली भल्ली भावय’ हा परंपरागत खेळ मोठ्या उत्साहात, आनंदात आणि भक्तीभावाने खेळला जातो. या खेळात लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंतच्या सर्वजण हा खेळ खेळतात. हा खेळ खेळायला आणि पहायला पंचक्रोशीतील लोक मोठ्या संख्येने गर्दी करतात.
कोळोशी येथील गांगेश्वर मंदिरात सर्व ग्रामस्थ एकत्र येवून तरंगांना वस्त्र नेसवून पुढील धार्मिक विधीसाठी हुकूम घेतात. तिथे पूजा विधी झाल्यानंतर पुढील कामासाठी पावणादेवी मंदिरात सर्वजण एकत्र येतात. ढोलताशांच्या गजरामुळे आसमंतात भक्तीमय वातावरण निर्माण होते. या मंदिरातील पूजाविधी आटोपल्यानंतर दुपारी ग्रामस्थांसाठी मंदिरात ब्राह्मण भोजन होते. त्यानंतर खऱ्या अर्थाने भल्ली भल्ली भावय या खेळाला सुरुवात होते.
या खेळात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाच्या हातात आंब्याचा टाळ आणि लाकडी खुंटी दिली जाते. तत्पूर्वी हा खेळ सुरु होण्यापूर्वी देवीची ओटी भरण्यासाठी महिलांची मोठ्या संख्येने गर्दी असते. त्यानंतर भल्ली भल्ली भावय या खेळाला सुरुवात होते. ढोलांच्या नादमय तालावर भल्ली भल्ली भावयचा गजर करीत या खेळाला सुरुवात केली जाते.
ढोलांच्या गजरात सर्वजण उत्साहात आणि भक्तीभावाने हा खेळ खेळतात. लहान मुलांसह वयोवृद्धांपर्यंतचे अनेकजण यामध्ये उत्साहाने सहभागी होतात. त्यानंतर अनेकांचे कौशल्य पणाला लावणारा ‘जमीन धरणे’ हा खेळ खेळला जातो. हातांचा वापर करता फक्त खांद्यांनी समोरच्याला उचलले जाते. जो उचलेल त्याची सरशी होते. या दरम्यान अनेकजण आपली ताकद आजमावतात. या खेळातील शेवटचा भाग खूप मनोरंजनात्मक असतो. या खेळणाऱ्यांमधील एकजण डुकराचे सोंग घेऊन मंदिराभोवती धावतो. त्यावेळी सर्वजण डुक्कर अशी आरोळी घालत त्यावर झडप घालतात व त्याचे हातपाय पकडून लोंबकळत मंदिरासमोर घेऊन येतात. या खेळानंतर सर्वजण परिसरातील घनदाट राईमधील पाषाणात साठलेले पाणी अंगावरील खरचटलेल्या जागी लावतात. त्यानंतर तळीवर आंघोळ केली जाते. गेली अनेक वर्षे हा खेळ खेळला जात असून हा आगळावेगळा पारंपरिक खेळ पहायला गर्दी मोठ्या प्रमाणात असते. (वार्ताहर)