वेंगुर्ले कॅम्प येथे शासकीय भूखंडामध्ये अतिक्रमण

By Admin | Updated: July 28, 2014 23:17 IST2014-07-28T22:02:51+5:302014-07-28T23:17:30+5:30

चौकशीचा ठराव : नगरपरिषद सभेत नगरसेवक आक्रमक

Encroachment in Government Land at Vengurle Camp | वेंगुर्ले कॅम्प येथे शासकीय भूखंडामध्ये अतिक्रमण

वेंगुर्ले कॅम्प येथे शासकीय भूखंडामध्ये अतिक्रमण

वेंगुर्ले : नगरपरिषदेच्या कॅम्प येथील शासकीय भूखंडामध्ये अज्ञात व्यक्तीने दगडी कंपाऊंड घालून अतिक्रमण केले आहे. याची नगर परिषदेने तत्काळ चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, असा ठराव सोमवारी झालेल्या वेंगुर्ले नगर परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषदेच्या शिवाजी सभागृहात तहकूब झालेली बैठक पार पडली. नगर परिषदेच्या वेंगुर्ले येथील सर्व्हे नं. ४९१ या शासकीय भूखंडात एका व्यक्तीने दगडी कुं पण घातले आहे. नगर परिषदेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने तीव्र नाराजी दर्शवित दाजी परब, रमण वायंगणकर, नम्रता कु बल, अभिषेक वेंगुर्लेकर, सुषमा प्रभूखानोलकर, महेश वेंगुर्लेकर यांनी नगर परिषदेने या प्रकरणाची केवळ चौकशी न करता त्या व्यक्तीला तत्काळ नोटीस द्यावी व ते बांधकाम काढून टाकावे, अशी मागणी केली. हॉस्पिटल नाका ते वेंगुर्ले हायस्कूलपर्यंतच्या रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. हा रस्ता करण्यात यावा, मागणी दाजी परब यांनी केली. यावर हा रस्ता करता येणार नाही.
मात्र, खड्डे बुजविता येतील, असे मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी सांगितले. शहरात रस्त्यांची कामे सुरू असताना व रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम ठेकेदार करीत असताना यापूर्वी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अशी कामे अडविली असल्याची तक्रार नम्रता कुबल यांनी केली. यावर मुख्य लिपिक हनीफ म्हाळुंंगकर यांनी हे काम काही व्यक्तींनी काम थांबविण्याची धमकी दिल्यामुळे ठेकेदाराने थांबविले असल्याचे सांगितले.
यावर एखाद्या व्यक्तीच्या धमकीमुळेही नगर परिषदेचे काम थांबते का, असा सवाल अ‍ॅड. सुषमा प्रभूखानोलकर यांनी केला. तसेच कोणाच्या धमकीला न घाबरता काम सुरू करावे, असे अभिषेक वेंगुर्लेकर व नम्रता कुबल यांनी सांगितले. नगराध्यक्ष कुबल यांनीही यास दुजोरा दिला. माणिक चौक येथे उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना होऊ नये, यासाठी पोलीस निरीक्षकांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना काढलेल्या नोटीसीचे वाचन सभागृहात होताच, माणिक चौक येथील जागा नगरपरिषदेची असली तरी त्या ठिकाणी शिवाजी महाराजांंचा पुतळा नगर परिषदेने उभारलेला नसून ज्यांनी तो उभारला आहे, त्या व्यक्तींना पोलिसांनी नोटीसा काढाव्यात, असे नम्रता कुबल, अभिषेक वेंगुर्लेकर, रमण वायंगणकर यांनी सांगितले.
वेंगुर्ले कॅम्प येथे शासनाचे ५० लाखाचे सुसज्ज असे हॉस्पिटल उभारण्यासाठी जी जागा लागणार आहे, त्यासाठी पोलीस परेडसाठी आरक्षित असलेल्या जागेचे आरक्षण रद्द करून ती जागा हॉस्पिटलसाठी आरक्षित करावी, असा ठराव या बैठकीत घेण्यात आला.
नगर परिषदेत बांधकाम अभियंता नसल्याने अनेक कामांची अंदाजपत्रके तयार करण्यात आलेली नसल्याचे मुख्याधिकारी दळवी यांनी सांगितले. भुयारी गटार योजनेसंदर्भात अ‍ॅक्वाटेक कंपनीकडून नगर परिषदेला आलेल्या नोटीसीसंदर्भात मागविण्यात आलेल्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही व्हावी, अशी सूचना रमण वायंगणकर यांनी केली.
शहरातील विकास कामांच्या प्रस्तावांना किंवा अंदाजपत्रकांना सभागृहाबाहेर मंजुरीसाठी ठेवताना त्या कामांचा परिपूर्ण प्रस्ताव सभागृहासमोर ठेवण्यात यावा. जेणेकरून त्या कामाचे स्वरूप, कोणत्या प्रकारचे साहित्य वापरण्यात येणार आहे, कामाचा दर्जा यानुसार अंदाजपत्रकाला मंजुरी देता येईल, अशी सूचना अ‍ॅड. सुषमा प्रभूखानोलकर यांनी केली.
नगर परिषदेस तांत्रिक सल्लागार नेमणेसंदर्भात यापूर्वीची सेवा खंडीत करून नवीन सेंटर काढण्याचे ठरविण्यात आले. सफाई कर्मचारी स्टाफ क्वॉर्टस विकसित करणे, घोडेबाव उद्यानातील सर्व लाईट दुरुस्त करणे शक्य नसल्याने नवीन लाईटस् बसविणे, जलशुध्दीकरण केंद्रावर सोलार लाईटस् बसविणे आदी कामांना मंजुरी देण्यात आली. शहरात महत्त्वाच्या ठिकाणी पालिकेमार्फत सीसीटीव्ही कॅ मेरे बसविण्यासंदर्भात पोलीस ठाण्याकडून देण्यात आलेल्या पत्रावर निधीची उपलब्धता झाल्यानंतर यावर विचारविनिमय करावा, असे ठरविण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Encroachment in Government Land at Vengurle Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.