कॅ टरिंग व्यवसायातून महिला सबलीकरण
By Admin | Updated: September 24, 2015 00:06 IST2015-09-23T23:34:27+5:302015-09-24T00:06:50+5:30
जागृती बचतगट : भटवाडीत खाद्यपदार्थांचे प्रशिक्षण

कॅ टरिंग व्यवसायातून महिला सबलीकरण
वेंगुर्ले : भटवाडी येथील जागृती महिला बचतगटातर्फे लकी कॅटरर्स या नावाने कॅटरिंग हा व्यवसाय सुरू करण्यात आला असून महिलांनी बनविलेले उत्कृष्ट खाद्यपदार्थ विविध ठिकाणचे कार्यक्रम, सभा-संमेलने, लग्न समारंभ, क्रीडा स्पर्धा, शासकीय कार्यालये या ठिकाणी पुरविले जातात.गेली २७ वर्षे सातत्याने कार्य करणाऱ्या वेंगुर्लेतील जागृती क्रीडा - सांस्कृतिक मंडळाने महिला बचतगटाची स्थापना केली असून जागृती मंडळाप्रमाणेच जागृती महिला बचत गटातर्फे विविध कार्यक्रम, स्पर्धा सातत्याने होत असतात. बचतगटाच्या अध्यक्षा सायली मालवणकर यांनी बचतगटाच्या माध्यमातून महिलांना एक व्यासपीठ मिळवून दिले आहे. अशा या जागृती महिला बचतगटाची आदर्शवत वाटचाल सुरू आहे.
जिल्हा व जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या पर्यटकांना, शालेय व शेतकरी सहलींना अल्पोपाहार व जेवणाची तसेच त्यांची राहण्याची सोय जागृती बचतगटातर्फे करण्यात येते. आलेल्या पर्यटकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन केले जाते. त्यांना येथील लोककलांचे दर्शनही घडविले जाते. मालवणी जेवणाचा स्वाद घेण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते.
जागृती बचतगट चिकन फेस्टिव्हल व व्हेज फेस्टिव्हल आयोजित करीत असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या फेस्टिव्हलमध्ये वेंगुर्लेतील अन्य महिला बचतगटांचे स्टॉल असतात. उत्कृष्ट खाद्यपदार्थ बनविणाऱ्या स्टॉल्सना बक्षिसेही दिली जातात. महिलांसाठी उद्योगधंदे सुरू करण्यासाठी सिंधुसागर पर्यटन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकता प्रशिक्षण शिबिराचे आयोजनही जागृती बचतगटाने केले होते. विविध खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण शिबिरही आयोजित केले होते. जागृती महिला बचतगट एवढ्यावरच न थांबता त्यांनी पथनाट्याद्वारे तंटामुक्त गाव मोहिमेतही भाग घेतला.
वटपौर्णिमेनिमित्त सुहासिनी महिलांची फळे व भाजीपाला बियाणाने ओटी भरून पर्यावरणमुक्त अशी वटपौर्णिमा साजरी करून वृक्ष लागवडीचा संदेश देत आहेत. मकर संक्रांतीला कापडी पिशव्यांचे वाण देऊन पर्यावरण रक्षणाचा सल्ला दिला आहे. या महिला
बचतगटाला जागृती मंडळाचे अध्यक्ष संजय मालवणकर, अण्णा जोशी व सीमा नाईक यांचे मार्गदर्शन
लाभत आहे.
अथक परिश्रमाचे यश
गेल्या २७ वर्षांत आमच्या गटाच्या महिलांनी अथक परिश्रम घेऊन बचतगटाची उन्नती केली. कामात सातत्य आणि आत्मविश्वासाने महिलांनी मेहनत घेतल्याने बचतगटाला यशोशिखरावर नेण्यात यश मिळाले. यशाचे शिलेदार गटातील सर्वच महिला असून समाजापुढे आदर्शवत कार्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
-सायली मालवणकर,
अध्यक्षा जागृती महिला बचतगट.