अरबी समुद्रातील निवती रॉक येथील कर्मचारी अद्याप दीपगृहातच

By Admin | Updated: September 7, 2014 23:19 IST2014-09-07T22:59:41+5:302014-09-07T23:19:06+5:30

निवती रॉकमधील प्रकार : कर्मचाऱ्याच्या हातापायांना सूज

Employees from the Rocky Rock of the Arabian Sea are still in the hall | अरबी समुद्रातील निवती रॉक येथील कर्मचारी अद्याप दीपगृहातच

अरबी समुद्रातील निवती रॉक येथील कर्मचारी अद्याप दीपगृहातच

सावंतवाडी : वेंगुर्ले तालुक्यात अरबी समुद्रातील निवती रॉक येथील दीपगृहावर देश संरक्षणासाठी असलेल्या तीन कर्मचाऱ्यांवर गेले सहा दिवस उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी व त्यांना धान्य व औषध पुरवठा करण्यासाठी कोणतेही साधन नसल्याने तिन्ही कर्मचाऱ्यांची अवस्था गंभीर बनली आहे. यातील एका कर्मचाऱ्याच्या हाताला व पायाला सूजही आली आहे. रविवारी सायंकाळपर्यंत या कर्मचाऱ्यांना धान्य व औषध पुरवठा करण्यात आला नव्हता.
याबाबत माहिती अशी की, देश संरक्षणासाठी अरबी समुद्राच्या प्रत्येक महत्त्वाच्या किनाऱ्यावर दीपगृह उभारण्यात आले आहेत. तसाच दीपगृह निवती येथे आहे. या दीपगृहात असिस्टंट लाईट किपर ए. एस. सोरस (रा. गोवा), दीप परिचर राजेंद्र वाल्मिकी (रा. जादूमई उत्तरप्रदेश), एस. एम. जाधव (रा. देवरूख-रत्नागिरी) हे तीन कर्मचारी कार्यरत आहेत. दर तीन महिन्यांनी येथील कर्मचारी बदलले जातात. त्यांना तीन महिने पुरेल, एवढा धान्य साठा, औषधे दिली जातात. परंतु या कर्मचाऱ्यांचा धान्यसाठा पाच-सहा दिवसांपूर्वीच संपला आहे. तसेच त्यांच्याकडे औषधेही नाहीत. त्यांच्याकडे संपर्कासाठी कोणतेही साधन नाही. यातील एका कर्मचाऱ्याने गेले काही दिवस कुटुंबाशी संपर्क न साधल्याने हा प्रकार उघडकीस आला. मात्र, या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेली बोट अद्यापपर्यंत उपलब्ध झाली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना बाहेर काढणे किंवा त्यांच्यापर्यंत धान्य पुरवठा करणे या दोन्ही गोष्टी शक्य झाल्या नाहीत.
दरम्यान, यातील राजेंद्र वाल्मिकी या कर्मचाऱ्याला मधुमेहाचा त्रास असून त्याच्या हातापायांनाही सूज आली आहे. तर ए. एस. सोरस यांना हृदय विकाराचा त्रास आहे. त्यामुळे बंदर विभागाने या कर्मचाऱ्यांना शक्य तेवढे लवकर तेथून बाहेर काढणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांची प्रकृती आणखी गंभीर होण्याची भीती आहे.
स्थानिक रहिवासी आबा कोचरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी असा कोणताही प्रकार घडला नव्हता. हा पहिल्यांदाच प्रकार घडत आहे. अद्यापपर्यंत या कर्मचाऱ्यांना धान्य पोहोचविले गेले नाही. समुद्र खवळला असल्याने समुद्रात बोट घालणेही शक्य नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या सुटकेसाठी बंदर विभागाने हॅलिकॉप्टरची सोय करणे गरजेचे आहे. पण अद्यापपर्यंत अशी कोणतीही सोय केली
नसल्याचे आबा कोचरेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Employees from the Rocky Rock of the Arabian Sea are still in the hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.